भंडारगडावर दुमदूमला हरिनामाचा गजर, विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमानी केली अंगरिका चतुर्थी साजरी
(रवी लोखंडे /पारध )
भोकरदन तालुक्यातील देहेड जवळील भंडारगडावर मंगळवारी अंगारिका चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंगारिका चतुर्थीनिमित्त भंडारगडावर नेत्र तपासणी शिबीर, हरी किर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली शेलूदकर, ह. भ. प. विष्णू महाराज सास्ते आणि वारकरी मंडळीच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. यावेळी भंडारगड भक्तांच्या मांदियाळीने फुलून गेला होता तर हरी कीर्तनाने भंडारगड दुमदुमून गेला होता.
मंगळवारी अंगारिका चतुर्थीनिमित्त पारध परिसरातील देहेड जवळील भंडारगडावर परिसरातील वारकरी मंडळींनी सुरु केलेल्या फिरती चतुर्थी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त ह. भ. प. ज्ञानेश्वर कदम (छोटे कदम माऊली ), आळंदी देवाची यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तर सामाजिक उपक्रम म्हणून मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप वाघ आणि श्रीमंता राऊत यांनी केले होते. मंगळवारी भंडारगडावर दिवस भर यात्रेचे स्वरूप आले होते. हरीनामाच्या गजराने भंडारगड परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी कीर्तन श्रवणाचा, रक्तदान शिबिराचा, नेत्र तपासणी शिबिराचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी 320शिबिरार्थिची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 21 जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. या 21 जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आम्ही सर्व खर्च करणार असल्याचे या शिबिराचे आयोजक दिलीप वाघ आणि श्रीमंता राऊत यांनी सांगितले.
:-सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असल्यामुळे परिसरातील अनेक नेते, पुढारी, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भावी उमेदवार यांची देखील या कार्यक्रमासाठी जमलेला जनसमुदाय पाहून फेरफटका मारतांना दिसलें.
यावेळी परिसरातील भाविकांसह वारकरी, संत, महंत, सन्यासी उपस्थित होते.