बदनापुर नगर पंचायत फेरीनुसार पडली इतकी मते ;भाजपने मिळवली सत्ता
बदनापूर प्रतिनिधी( किशोर सिरसाट)
बदनापूर: बदनापूर नगरपंचायत च्या दि. 21 डिसेंबर व दि. 18 जानेवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (दि. 19 जानेवारी) तहसील कार्यालयात झाली. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत 9 जागेवर निर्विवाद विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसने 5, काँग्रेसने एक तर अपक्षांनी 2 ठिकाणी विजय मिळविलेला आहे. विशेष म्हणजे अपक्ष असलेले दोघेही भाजपचे समर्थक असल्यामुळे आ. नारायण कुचे यांनी बदनापूर नगर पंचायतवर निर्विवाद यश मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.
बदनापूर नगर पंचायतमध्ये महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत आघाडीने एकत्रित लढत दिली तर दुसऱ्या टप्प्यात मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीतून माघार घेत चार ही वॉर्डात उमेदवार दिले होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रचार केल्यामुळे महाविकास आघाडीने मोठी शक्ती पणाला लावलेली होती. मात्र, भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी ही सर्व व्यूहरचना भेदत महाविकास आघाडीला धोबीपछाड देत नगरपंचायतवर एकहाती सत्ता प्रस्थापिक झाल्याचे चित्र आजच्या निकालात दिसून आले .
सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप व सहनिवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या उपस्थितीत मतपेट्या (ईव्हिएम) असलेल्या स्ट्राँगरूम उघडण्यात येऊन मतमोजणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावेळी जसजसे निकाल जाहीर होत होते. तशी तहसील परिसरातील विजयी उमदेवार समर्थकात मोठा आंनदोत्सव साजरा होत होता. औरंगाबाद- जालना मुख्य मार्गावर तहसील परिसर असल्यामुळे महामार्ग परिसरात हजारोच्या संख्येने समर्थक जमलेले असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना मेहनत घ्यावी लागत होती. जसजसे निकाल जाहीर झाले तसतसे भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कोरोनाचे भान विसरत उमेदवार व समर्थक प्रचंड घोषणाबाजी करताना दिसून येत होते.
सविस्तर निकाल खालीलप्रमाणे (कंसात पक्ष व पडलेली मते) विजयी व प्रतिस्पर्धी उमेदवार वॉर्ड क्रमांक एक – खैरे भाग्यवती गोरखनाथ (भाजप – 406) जऱ्हाड शांताबाई बाबासाहेब (काँग्रेस – 168) वॉर्ड क्रमांक दोन – बाबासाहेब रघुनाथ कऱ्हाळे (भाजप -478) कऱ्हाळे शिवाजी दगडू (270- शिवसेना), वॉर्ड क्रमांक तीन – जऱ्हाड पांडूरंग बाबूराव (राष्ट्रवादी – 300) जऱ्हाड रमेश शामराव (भाजप – 179), वॉर्ड क्रमांक 4 – शेख समीर चाँद (भाजप 262) पठाण फिरोजखान (राष्ट्रवादी 249), वॉर्ड क्रमांक पाच – मगरे ज्योती सुभाष (काँग्रेस – 231), गायकवाड हौसाबाई बन्सी (अपक्ष – 203), वॉर्ड क्रमांक 6 – चित्रा संतोष पवार (भाजप – 249) सोनवणे रविना विष्णू (काँग्रेस 137) वॉर्ड क्रमांक सात – गिल्डा अर्चना सत्यनारायण (भाजप – 345) इंदाणी प्रिया आनंद (शिवसेना 190), वॉर्ड क्रमांक आठ शेख मतीन (राष्ट्रवादी बिनविरोध), वॉर्ड क्रमांक नऊ – सय्यद यास्मीन बेगम (राष्ट्रवादी – 265), काझी मुदब्बीर जहीर (243), वॉर्ड क्रमांक दहा – साबळे आम्रपाली प्रदिप (भाजप – 213), साबळे विलास विनायक (166), वॉर्ड क्रमांक अकरा – सय्यद इम्रान इसा (राष्ट्रवादी – 143), शेख समीर सत्तार (अपक्ष – 130), वॉर्ड क्रमांक बारा – बारगाजे मंगल जगन्नाथ (भाजप – 331) कांबळे सुनिता एलिया (शिवसेना – 170), वॉर्ड तेरा – शेख वसिम मुस्तफा (अपक्ष – 185), शेख जावेद वहाब (अपक्ष – 156), वॉर्ड चौदा –जऱ्हाड वैशाली विजय (भाजप – 192), जऱ्हाड पूजा राहुल (शिवसेना – 187), वॉर्ड पंधरा – साबळे विनोद दिलीप (267), वाहुळे रविराज रमेश (वंचित 123), वॉर्ड क्रमांक सोळा – शेख शहाना ईकबाल (राष्ट्रवादी 360) शेख अंजुमबी युनूस (एमआयएम 189), वॉर्ड क्रमांक सतरा – डाके अर्चना परमेश्वर (भाजप – 156), शेख दौलत बी गुलाब (130). भाजपने बदनापूर नगर पंचायतमध्ये निविर्वाद विजय मिळवला असून आता नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळयात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.