संपादकीयसांस्कृतिक बातम्या

दाेन वर्षानंतर पुन्हा पिपंरखेड बु मध्ये रंगणार नाट्यमहोत्सव

लोकसंस्कृती लोप पावत चालली असताना मातीशी व माणसाशी इमान राखून सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे काम दोन शतका पासुन अखंड चालू आहे. आज महाराष्ट्रात ग्रामीण नाट्य परंपरा जवळपास मोडकळीस आली आहे. ती परंपरा जोपासण्याचे काम पिंपरखेड बुद्रुक गावात आजही अविरत चालू आहे.

images (60)
images (60)

मागील दाेन वर्षापासुन काेविड मुळे नाट्य पंरपरा खंडीत झाली हाेती पन या वर्षी नव्याने व उत्साहात पुन्हा एकदा नाट्य महाेत्सव हाेत आहे.

पिंपरखेड बुद्रुक हे गाव जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात दक्षिण दिशेस गोदावरी परिसरात वसलेल गाव. हा भाग गंगथडी म्हणून ओळखला जातो. गावची लोकसंख्या सात  हजार सर्व जाती धर्माचे व बारा बलुतेदार येथे गुण्या गोविंदाने नांदतात. आतापर्यंत कधीही गावात जातीय धार्मिक तेढ निर्माण झाली नाही. सामाजिक सलोखा व शांतता येथील परंपरेतच आहे. गावाच्या बाजूने पैठण डावा कालवा गेलेला आहे. त्यामुळे ८० टक्के क्षेत्र ओलीताखाली आहे. येथील शेती काळी कसदार असून शेतकरोही कष्टाळू व मेहनती आणि जिद्दी आहे. यामुळे हे गाव पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये उत्पादनात अग्रेसर आहे. गावचा बहुतांश मुख्य व्यवसाय शेती हाच आहे.

“नारोळा नदीच्या काठी वसलेल्या या गावाला धार्मिक व पौराणिक इतिहास असून, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. वर्षभर येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. अखंड हरिनाम सप्ताह, सण, उत्सव, आषाढी यात्रा, गाथा पारायण, दत्तजयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सामाजिक कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी व शेतीविषयक कार्यक्रम अशी रेलचेल असते. रोजगारानिमित्त बाहेरगावाहून आलेली मंडळी आज येथे चांगली स्थिरावल्यामुळे गाव हे बहुसांस्कृतिक झाले आहे. गावाचे प्रमुख ग्रामदैवत श्री विठ्ठल रखुमाई व श्री हनुमान (महारुद्र) आहे. येथे पंढरपूरप्रमाणे विठ्ठल व रखुमाईचे मंदिर स्वतंत्र आहे. नदीमध्ये कुंडलिक तीर्थक्षेत्र आहे. प्रतिपंढरपूर अशी या गावाची पंचक्रोशीत ख्याती आहे. विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. आषाढी पौर्णिमेला काल्याच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.

दूरवरून भाविक भक्त दर्शन व यात्रेला येतात, विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच श्री महारुद्राचे दक्षिणमुखी मंदिर आहे.

हा महारुद्र नवसाला पावतो अशी आख्यायिका आहे. महारुद्र जन्मोत्सवानिमित्त येथे दुसऱ्या दिवशीपासून प्रतिवर्षी नाट्यमहोत्सव सुरू होतो. ‘सीता स्वयंवर’ या परंपरेच्या संगीत नाटकाने महोत्सवाची सुरुवात होते. हे नाटक प्रतिवर्षी परंपरेने करावेच या महोत्सवास सुरुवात झाली असा नाट्यसंहितेत उल्लेख आहे. सर्व मराठवाड्यात फक्त पिंपरखेड याच गावी हा आगळावेगळा परंपरेने चालत आलेला महोत्सव चालू आहे. पूर्वीच्या काळी जुनी मंडळी टेंभे लावून दिव्याच्या प्रकाशात व पत्र्याचे शेड उभारून नाट्यप्रयोग करत असत. ध्वनीयंत्रणाही नव्हती. १९८० च्या नंतर गावात वीज आली. यानंतर ध्वनीयंत्रणा व प्रकाशात प्रयोग होऊ लागले.

या रंगभूमीचे वैशिष्ट्य असे आहे की,कलावंतानीही अभिनय करून सेवा केली आहे. आजही काही पात्रे वारसा चालवतात. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा व हार्मोनियम (संवादिनी) तबला, टाळ, झांज व साथसंगत ही परंपरेने आजही गावकरीच करतात. आजही ती परंपरा चालू आहे. आज मंडळाचे स्वतःच्या मालकीचे भव्य रंगमंदिर आहे. तीर्थक्षेत्र ‘ब’ मध्ये गावाचा समावेश आत्ता नव्याने झाल्यामुळे शासनाचे अनुदान मिळुन माेठे विकास कामे हाेतील.

या महोत्सवाला या गावाबरोबरच बाहेरगावची व पंचक्रोशीतील मंडळी हजेरी लावतात. प्रत्येक घरी पाहुणे मंडळी व माहेरवाशीन आवर्जून येतात. या गावच्या माणसाने कलेला लोकाश्रय तर दिलाच पण देणगीच्या रूपात राजाश्रय देऊन ही परंपरा अखंडित चालू ठेवण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. या गावातील कोणत्याही कलावंताने कुठलेही प्रशिक्षण न घेता, या जुन्या मंडळीने चालवलेला कलेचा वारसा डिजिटल युगात नवीन

पिढीही समर्थपणे चालवत आहे. येथील प्रत्येक माणसाचे अंगी कलाकाराचे गुण आहेत. परंपरेने सेवा करण्याचे काम आजही अहोरात्र सुरू आहे.

आतापर्यंत परंपरेने चालत आलेल्या या महोत्सवास म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. हा वारसा जतन करण्याचे या गावकऱ्यांचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. यातील सीता स्वयंवर, बाणासुर व भीष्मपर्व ही संगीत नाटके गावच्या पूर्वजानीच लिहिलेली आहेत. याची लिखित प्रत आजही हस्तलिखीत स्वरूपात आहे.

बदलत्या काळाबरोबर महोत्सवही आता बदलत चालला आहे. संगीताचा वापर आता संगीत नाटक वगळता रेडिमेड स्वरुपात होत आहे. परंतु अजूनही संगीत नाटकाचे नाट्यपद (साकी) अजूनही मूळ संगीताद्वारे सादरीकरण होते. या गावचे प्रती बालगंधर्व म्हणून परिचित असलेले धाेंडीराम सानप हे उत्कृष्ट गायन करून सेवा देतात. तबला साथसंगत काशीनाथजी जोशी, सार्थक जाेशी , हार्माेनिअम संवादिनी साथसंगत नामदेव आर्डे व लक्ष्मण जोशी व सहकारी देतात. आज संपुर्ण महाराष्ट्रात अशी परंपरा व नाट्यपदे (साकी) स्वरचित आणि चालीही स्वरचित (पेटेंट) कुठेच नाही. याचे जतन व संवर्धन व्हायला हवे आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे हीच कामना आहे.

या नाट्य महोत्सवाचे पाईक व पितामह कै. अच्युतराव कुलकर्णी यांच्या घराण्याची पुढील पिढीही बहादूरकाका व उमेश कुलकर्णी हे सूत्रधाराचे काम करत आहेत. याबरोबरच कै. दासोपंत कुलकर्णी, के. अंबादास जोशी, कै. नामाजी देवकाते कै. अंजीराम आघाव कै. बाबुराव सानप यांच्याबरोबर संपतराव देवकते, रावसाहेब पाटील, रामराव सानप यांचे मार्गदर्शनाखाली नाट्यमंडळ कार्यरत आहे. हा महोत्सव सर्वदूर पोहोचावा व शासनाने या कलावंतांचा हा अनमोल ठेवा व संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी हातभार लावून प्रसिद्धी द्यावी. या ग्रामीण कलाकारांची दखल नाट्यरसिकांनी व मायवाप जनतेने घेऊन लोकाश्रय व राजाश्रय द्यावा. ही परंपरा अखंडित सुरु ठेवण्याच्या गावकऱ्यांच्या सेवेला सलाम करावा.

असे आहेत कार्यक्रम 

दि.१७/०४ वार रविवार सिता स्वयंवर 

१८/०४ सोमवार सत्व परिक्षा

१९/०४ मंगळवार दिवा पाहिजे वंशाला

२०/०४ बुधवार अखंड

२१/०४  गुरुवार साेयरीक, २२/०४  शुक्रवार संगीत भिष्मपर्व

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!