अखेर ते पिसाळलेले माकड ग्रामपंचायतच्या पुढाकाराने पकडण्यात यश
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी परिसरात पिसाळलेल्या माकडाने दोन दिवस धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांना हातात काठी, कुऱ्हाड घेतल्याशिवाय बाहेर पडणे अशक्य झाले होते. शनिवारी दुपारी ग्रामपंचायतने पुढाकार घेवुन खाजगी मोकाट माकड पकडणार्यांना १० हजार रुपये देवुन या माकडाला जेरबंद केले.
सोयगाव देवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला होता. या माकडाच्या हल्ल्यात नाना इंगळे हे ग्रामस्थ पायाचा लचका तोडल्याने गंभीर जखमी झाले होते. माकडाच्या हल्ल्याने गावातील नागरिक भयभीत झाले होते. दोन्ही गावात माकडाची दहशत निर्माण झाली होती. माकड केव्हा येईल अन् हल्ला करेल या भीतीने ग्रामस्थांना ग्रासले होते. शेतात जाण्यासाठी काठी हातात घेऊन घराबाहेर पडावे लागत होते. सोयगाव देवीचे ग्रामसेवक नारायण साबळे व सरपंच यांनी पुढाकार घेवुन एका खाजगी मोकाट माकड पकडणार्या व्यक्तींना शनिवारी बोलावुन गावकर्यांच्या मदतीने पिसाळलेल्या माकडासह १५ ते २० माकडांना पिंजऱ्यात पकडण्यात आले.