अबब ..तहसिल कार्यालयासमोर शेतकऱ्याने स्वतःला खड्यात घेतले गाडून
जालना / प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी मंडळातील डाळिंबाच्या पिकविम्याचे अनुदान देण्यात यावे यासाठी आज तहसिल कार्यालयासमोर शेतकऱ्याने स्वतःला खड्यात गाडून घेत आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती . कारभारी म्हसलेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे . दरम्यान वारंवार निवेदन देऊनही प्रशासन ताळयावर येत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे शेतकऱ्याने सांगितले .
बदनापूर तालुक्यातील सर्व मंडळांना विमा कंपनीने विमा दिलेला असून दाभाडी मंडळ हे सतत 3 वर्षांपासून वगळण्यात येत आहे . आमच्या मंडळामध्ये सर्वांत जास्त डाळींब या पिकाचे प्रमाण असून शेतकऱ्यांनी डाळींब विमा भरलेला आहे . डाळींब पीक पूर्णपणे उद्धवस्त झालेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊनही कंपनीने विम्यापासून वगळून दाभाडी मंडळावर अन्याय केलेला आहे , असा आरोप शेतकऱ्याने केला .
विमा कंपनीने केलेला हा अन्याय दूर करण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी निवेदन व अर्ज दिलेला होता . परंतु प्रशासनाने कोणतेही समर्पक उत्तर मिळाले नाही . म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दाभाडी येथील कारभारी म्हसलेकर या शेतकऱ्याने स्वत : ला जमिनीत गाडुन आंदोलन केले आहे . या वेळी दाभाडी मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .