औरंगाबादजालना क्राईम

छत्रपती संभाजीनगर येथे सेक्‍स रॅकेटचा (Sex Racket) सिडको पोलिसांनी पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासच्या सेनानगरातील बंगल्यातून सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटचा (Sex Racket) सिडको पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आज, २० जानेवारीला या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. बीड बायपासच्या बंगल्यातून सेक्‍स रॅकेटचालक तुषार राजपूतसह पाच जणांना अटक केली होती. एका विदेशी तरुणीसह दिल्लीच्या दोन तरुणींची सुटका केली होती. या सेक्‍स रॅकेटची पाळेमुळे खोदताना सेक्‍स रॅकेटची सूत्रधार व आंतरराष्ट्रीय एजंट असलेली कल्याणी उर्फ जयश्री उर्फ टीना उमेश देशपांडेला kalyani deshpande (वय ५५) हिला छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तिला सिडको पोलीस ठाण्यात रात्री हजर करण्यात आले.

images (60)
images (60)

पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे व त्यांच्या पथकातील सहायक फौजदार सतीश जाधव, विलास कोतकर, राहुल खरात, काकासाहेब अधाने, संदीप राशीनकर, संजीवनी शिंदे यांनी ही कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पत्रकारांना दिली. कल्याणी ही पुण्याच्या बाणेर परिसरातील बालाजीनगरातील रहिवासी आहे. तिच्याविरुध्द यापूर्वी पुण्यातील डेक्कन, कोथरूड, चतुःश्रृंगी, हवेली, मालवणी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांसह एकूण २४ गुन्हे दाखल आहेत. तुषार व कल्याणी देशपांडे यांचे व्यवसायिक संबंध असल्याच्या माहितीवरून कल्याणीला ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उझबेकिस्तानची २८ वर्षीय आणि दिल्लीच्या २२ व ३० वर्षे वयाच्या दोन तरुणींना कल्याणीनेच छत्रपती संभाजीनगरात पुण्यावरून पाठवले होते. त्‍यामुळे कल्याणी पोलिसांच्या रडारवर आली होती.पोलिसांनी कल्याणीला तुषारबद्दल विचारणा केली असता ती म्‍हणाली, की तुषार ताे चिल्लर है…

पोलीस उपायुक्‍त नवनीत काँवत, पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने गेल्या मंगळवारी रात्री सेनानगरातील बंगल्यावर छापा मारल्यावर सेक्‍स रॅकेटचालक तुषार राजन राजपूत (वय ४२, रा. घर क्र. ६२, न्यायनगर, गारखेडा) त्‍याचा साथीदार प्रवीण बालाजी कुरकुटे (वय ४०, रा. एशियाड कॉलनी, बाळापूर) आणि तिथे काम करणारे गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव (वय २९, रा. कुंभारपिंपळगाव, ता. घनसावंगी, जि. जालना), लोकेशकुमार केशमातो (वय ३५) आणि अर्जुन भुवनेश्वर दांगे (वय ३८, दोघे रा. झारखंड) यांना अटक केली होती, तर तीन तरुणींची सुटका केली होती. तरुणींपैकी एक २८ वर्षीय तरुणी उझबेकिस्तानची आहे. ती विवाहित असून, कॅसिनोत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाल्याचे सांगून ९ डिसेंबरला भारतात दिल्लीत आली होती. १४ जून २०२४ पर्यंत तिचा व्हिजिटर व्हिसा मंजूर होता. दिल्लीत येताच ती सेक्स रॅकेटमध्ये सक्रीय झाली होती.

असे फुटले होते बीड बायपासचे बिंग…
उच्‍चशिक्षित प्राध्यापक सुनील रामचंद्र तांबट (वय ५४, रा. एन ७ सिडको) याच्या तांबट एज्‍युकेशनच्या विशाल टॉवर या इमारतीच्या तळमजल्यावर शनिवारी छापा मारून सिडको पोलिसांनी सेक्स रॅकेट उद्‌ध्वस्त केले होते. या ठिकाणी संदीप मोहन पवार (वय ३२, रा. जाधववाडी) याला अटक केली होती. त्‍याच्या चौकशीतून बीड बायपास भागातील बंगल्यातील सेक्स रॅकेटबद्दल पोलिसांना कळले होते.

कोण आहे कल्याणी देशपांडे?
कल्याणी ही सुमारे ९० च्या दशकापासून पुण्यातील देह व्यापाराचा भाग आहे. पण वर्ष २००० मध्ये तिचे नाव पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर आले. सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली कल्याणी पुण्यातील टॉप दलाल आहे. तिच्या बंगल्यातून व्हीनस एस्कॉर्ट्‌स नावाची एस्कॉर्ट्‌ एजन्सी चालवली जात होती. कल्याणीचा बंगला वेश्याव्यवसाय आणि गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. डिसेंबर २००७ मध्ये तिच्या जवळचा सहकारी अनिल ढोले याची याच बंगल्यात हत्या करण्यात आली होती. मुंबईतून वेश्याव्यवसायासाठी कॉल गर्ल्स आणण्यासाठी ढोले एजंट म्हणून काम करत असे. ढोलेच्या मृत्यूनंतर कल्याणीच्या कारवाया वाढल्या. कल्याणीने हॉटेलवाले आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेट यांच्यात दलाली करत मजबूत नेटवर्क निर्माण केले. तिच्याकडे खूप मोठा क्लायंट बेस होता. यापूर्वीही कल्याणीला अनेकवेळा अटक करण्यात आली होती. तिच्यावर मुंबईतही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर २००५ मध्ये पुण्याच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये एका सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी कल्याणीवर प्रथमच मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता, परंतु तिला नंतर निर्दोष सोडण्यात आले. ३१ मार्च २०१२ रोजी पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी कल्याणीला वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक केली. या प्रकरणात कल्याणी जामिनावर बाहेर पडण्यात यशस्वी झाली. प्रत्येक वेळी जामिनावर सुटल्यावर कल्याणीने तिचे सेक्स रॅकेट पोलिसांच्या नाकावर टिच्चून चालवले होते. कल्याणीने तिच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केल्याचे सांगितले जाते. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, मुंबई आणि अहमदाबाद येथे होत असल्याचा दावाही तिने केला होता. मात्र या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून कल्याणीला पोलिसांकडून तिचे शोषण आणि तिला वेश्याव्यवसायात कसे भाग पाडले गेले हे जगाला सांगायचे होते, असे तिने सांगितले होते. कल्याणीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, ती एका सामान्य कुटुंबातील आहे आणि तिचे लग्न एका ऑटोचालकाशी झाले आहे. १९९४ मध्ये मुलगा मृत्‍यूच्या दारात असताना एका मैत्रिणीने तिला वेश्या व्यवसायात ढकलले. तिने पोलिसांना सांगितले की, तिच्या कुटुंबासाठी पैशाची तातडीची गरज असल्याने तिला सेक्स रॅकेटमध्ये ओढले होते. कल्याणी देशपांडेला डिसेंबर २०२२ मध्ये विशेष न्‍यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती, हे विशेष.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!