आता विद्यार्थ्यांना घरपोच दाखला उपलब्ध करून दिला जाणार- जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ

दाखला आपल्या दारी अंतर्गत दाखला शिबीर संपन्न
जालना,
दि. ५ :- प्रशासनात गतिमानता येऊन नागरिकांना वेळेत सेवेचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखल्यांची गरज भासत असल्याने दाखला आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना घरपोच दाखला उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. गुरुवार दि.५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता जिल्ह्यातील चितळी पुतळी येथे दाखला आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दाखला शिबिर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू वाटप करण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना पास वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदारश्रीमती छाया पवार, सरपंच स्वप्ना वांजोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, विद्यार्थांना प्रवेशासाठी आवश्यक असलेला दाखला वेळेत मिळणार आहे. त्यामुळे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश घेणे सुलभ होईल. तसेच प्रशासन आपल्या दारी येऊन सामान्य माणसाला आपल्या घरकुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी ५ ब्रास वाळू देत असून आज प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी पासेस वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांच्या संकल्पनेतून दाखला आपल्या दारी हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. असे उपविभागीय अधिकारी श्री.हदगल यांनी यावेळी सांगितले. जिवंत सातबारा मोहिमेत मयत व्यक्तींच्या वारसांच्या नावे नोंदी घेण्यात आल्या असून जिवंत सातबारा मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून तसेच अग्रिस्टॅक प्रमाणपत्र नोंदणीत ८५ टक्के गाव पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी करणारे मंडळ अधिकारी श्री.हजारे व संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांच्या हस्ते विविध दाखले तसेच ५ ब्रास वाळुच्या पासेसचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मान्यवरांच्या हस्ते मंदिर परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास चितळी पुतळी गावातील घरकुल लाभार्थी, शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_