युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनियन च्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी एक दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संप
औरंगाबाद प्रतिनिधी:
बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनानी मिळून एकत्रित येऊन स्थापन केलेल्या युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनियन च्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी एक दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर देण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात बॅंकेचा व्यवसाय 250% पटीने वाढला आहे , 450 नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत तर कर्मचाऱ्यांची संख्या मात्र 20% ने कमी झाली आहे.
बॅंक गेल्या अनेक वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा या मुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरत नाही. याचा परिणाम म्हणून लोकांना रोज जास्त वेळ काम करावे लागते, सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते. आवश्यकतेनुसार सुट्या घेता येत नाहीत. यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे अशक्य झाले आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होत आहे. त्यांच कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
याशिवाय अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे समाधानकारक ग्राहक सेवा देता येणे अशक्य झाले आहे. याचा बॅंकेच्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून महा बॅंकेतील कर्मचारी विलक्षण मानसिक तणावातून जात आहेत. सर्व संघटनानी या प्रश्नी आपली कैफियत वारंवार मांडली पण व्यवस्थापन याला कुठलाच प्रतीसाद देत नाही हे लक्षात घेता नाईलाजाने संघटनानी शेवटचा मार्ग म्हणून शेवटी २७ जानेवारी संपाची हाक दिली आहे.
शेवटचा मार्ग म्हणून आज डेप्युटी चीफ लेबर कमीशनर मुंबई यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण व्यवस्थापनाच्या आडमुठेपणा मुळे कुठलीही तडजोड घडुन आली नाही.
या संपामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल संघटनेच्या वतीने दिलगीरी व्यक्त करण्यात येत आहे व असे आवाहन करण्यात येत आहे की उत्तम ग्राहक सेवेची गरज म्हणून नोकर भरती या त्यांच्या मागणीला ग्राहकांनी पाठिंबा द्यावा.
संपाच्या दिवशी कर्मचारी आपापल्या शाखांसमोर, कार्यालया समोर निर्दशने, धरणे कार्यक्रम संघटीत करून व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांना आपला विरोध प्रदर्शित करतील. या संपात महा बॅंकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन च्या वतीने निमंत्रक विराज टीकेकर व सह निमंत्रक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.