कॅनॉलमध्ये स्विफ्ट गाडी गेल्याने भुसार व्यापाऱ्याचा मृत्यू
घनसावंगी: तालुक्यातील भार्डी शिवारातील आझादनगर भागात जायकवाडीच्या डाव्या कालव्यात बुडून रुई येथील भुसार मालाचे व्यापारी नंदू सोनाजी राजगुरू वय 38 वर्षे यांचा दिनांक 10 एप्रिल रोजी 12 वाजेच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनासह पाण्यात गाडी गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील रुई येथील व्यापारी नंदू राजगुरू हे त्यांचे ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 12 के एन 2217 मध्ये बसून ते आपल्या रुई गांवातून तीर्थपुरीकडे जायकवाडी कॅनॉलच्या कच्च्या रस्त्याने जात असताना त्यांची स्विफ्ट डिझायर ही गाडी भार्डी जवळील आझादनगर येथून जवळच असलेल्या जायकवाडीच्या कॅनॉलमध्ये अचानक गेल्याने नंदू सोनाजी राजगुरू यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक दीपक लंके, पोहेकॉ नारायन माळी, भगवान शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले.
गोंदी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तीर्थपुरी पोलीस चौकी येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ भगवान शिंदे हे करत असल्याची माहिती गोंदी पोलिसांनी दिली आहे. मृताच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा, मुलगी, भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे.