विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा-पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढवा जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्या
लसीकरण केंद्रामध्ये वाढ करुन लसीकरणाची गती वाढवा
– पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
जालना, दि. 19 (न्यूज ब्युरो):- जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढत चाललेली संख्या ही अतिशय गंभीर व चिंताजनक असुन कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनामार्फत देण्यात येत असलेल्या सुचनांचे जालना जिल्हा वासियांनी तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करत विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोकडे, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, डॉ. सोनखेडकर, अन्न व औषध प्रशासनविभागाच्या श्रीमती अंजली मिटकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले असुन आणखीन आवश्यकता असल्यास सर्व बाबी उपलब्ध करुन देण्यात येतील. परंतु जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही,याची दक्षता घेण्याबरोबरच टेलिमेडीसीनसारखी अत्याधुनिक सेवा जालना जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा पुरेपुर उपयोग करण्यात येऊन आवश्यकता असेल त्यावेळी रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई, दिल्ली या ठिकाणच्या डॉक्टरांचा सल्ला या सुविधेमार्फत घेण्यात येऊन रुग्णांवर वेळेत व चांगल्या पद्धतीने उपचार करण्याच्या सुचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केल्या.
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने बेडचे व्य्वस्थित व निटनेटके नियोजन करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिकचे पैसे तर घेण्यात येत नाही ना याबाबत खात्री करण्यात येऊन रुग्णांकडुन उपचारापोटी देण्यात येणारी देयकांची लेखा परिक्षकांमार्फत नियमितपणे तपासणी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जालना जिल्ह्यात ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्यात यावी. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी आरटीपीसीआर लॅब असुन या लॅबची दरदिवसाची क्षमता एक हजार स्वॅब तपासणीची असुन दरदिवशी एक हजार टेस्ट झाल्याच पाहिजेच. एक हजार स्वॅबपेक्षा अधिक स्वॅब गोळा करण्यात आल्यास अहवालास उशिर होऊ नये यादृष्टीने स्वॅब औरंगाबाद अथवा पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचुकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. कोरोना बाधितांच्या सहवासितांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.
जालना जिल्ह्यामध्ये गतकाळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने सुरु करण्यात आलेली कोव्हीड केअर केंद्र बंद करण्यात आली होती. बंद करण्यात आलेली सर्व कोव्हीड केअर केंद्र तातडीने व पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावीत. या केंद्रामध्ये ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना सर्व सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात मिळतील याची खबरदारी घेऊन एकाही रुग्णांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही टोपे यांनी यावेळी दिले.
ज्या व्यक्तींना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत व ज्यांच्या घरामध्ये मुबलक प्रमाणात जागा आहे अशा व्यक्तींना होमआयसोलेशन करण्यास परवानगी देण्यात यावी. परंतु ज्यांच्या घरामध्ये मुबलक प्रमाणात जागा नाही तसेच ज्यांना कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत अशा व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्याबरोबरच गृहविलगीकरणामध्ये असलेली कुठलीही व्यक्ती रस्त्यावर फिरणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी व्हेटींलेटर, ऑक्सिजन बेड यासह सर्व सोयी-सुविधांनीयुक्त कोव्हीड सेंटर उभारण्यात आलेले असुन त्या त्या तालुक्यातील कोरोना रुग्णांवर त्यांच्या तालुक्यात उभारण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरमध्येच उपचार मिळावेत, याचीही सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.
कोरोनापासुन बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे सांगत जिल्ह्यात 57 ठिकाणी लसीकरण केंद्रे असुन या लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात यावी. जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रामधुनही लसीकरण करण्याच्या सुचना करत या केंद्रांच्या माध्यमातुन अधिक प्रमाणात लसीकरण करण्यात यावे. लसीकरणाच्या बाबतीमध्ये जालना जिल्हा प्रथम क्रमांकावर असावा, अशी अपेक्षाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती टोपे यांनी दिली.
बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.