कोरोना अपडेटजालना जिल्हा
जालना शहरातील एसआरपीएफ क्वॉटर्स परिसरात कोरोना चाचणीची स्वतंत्र सोय
जिल्हा सामान्य रुग्णालयात चाचणीसाठी गर्दी करु नये-जिल्हाधिकारी
दि. 24 (न्यूज जालना लाईव्ह ब्युरो ):- कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेला स्वॅब देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असुन यामुळे संसर्गाचा धोका वाढला असल्याने मंठा चौफुली येथे असलेल्या एसआरपीएफ क्वॉटरर्समध्ये कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोना चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी न करता एसआरपीएफ क्वॉर्टर्समध्ये जाऊन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भावासंदर्भात प्रशासनामार्फत प्रतिबंधक उपाययोजना आखण्यात आल्या असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या व्यक्तींना मध्यम व सौम्य लक्षणे आहेत व स्वॅबचा पॉझिटीव्ह आला आहे अशा व्यक्तींना डीसीसी, सीसीसी अथवा होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी रुग्णांची परिस्थिती पाहुन डॉक्टर्स निर्णय घेतील. तसेच ज्या रुग्णांना गंभीर लक्षणे आहेत अशा रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात येईल.
कोरोना विषाणुला हरवण्यासाठी प्रत्येकाने मास्क, सॅनिटायजर तसेच सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. विनाकारण रस्त्यावर फिरु नये, गर्दी होईल अशा ठिकाणी जाऊ नये. तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी केले आहे.