..या कारणांमुळे जांबसमर्थ येथील रामदास स्वामी यांच्या मंदिरातील विधीवत पूजा झाली बंद !
पगारवाढीसाठी कर्मचारी संपावर, रामदास स्वामींच्या मंदिरात पूजा बंद
भाविकांत संताप : कारवाईसाठी ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव
टीम न्यूज जालना : पगारवाढीच्या मागणीसाठी श्री क्षेत्र जांबसमर्थ (ता.घनसावंगी) येथील मंदिर ट्रस्टचे कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. कर्मचारीच संपावर गेल्याने मंदिरातील विधीवत पूजाअर्चा बंद पडल्या असून, या प्रकारामुळे संतप्त भाविक, ग्रामस्थांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार, पोलिस प्रशासनाकडे धाव घेवून निवेदन दिले आहे.
पर्यटन विकास ब दर्जा असलेल्या श्री क्षेत्र जांब समर्थ हे रामदास स्वामी यांचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते. सन १९३२ साली स्वामींच्या मंदिराचे बांधकाम झाले असून, त्या पूर्वीपासून रामदास स्वामींच्या मंदिरात विधीत स्वामींची पूजा केली जाते. परंतु दिनांक २ ऑक्टोबर सोमवारी समर्थ रामदास स्वामी ट्रस्टचे कर्मचारी हे पगार वाढीच्या मागणीसाठी ट्रस्टला पूर्वकल्पना देऊन संपावर गेले आहेत. परिणामी सोमवारी सकाळपासून संत रामदास स्वामी यांच्या मंदिरात विधिवत पूजा झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह भविकातून संताप व्यक्त होत आहे. समर्थ मंदिर व राम मंदिर जांबसमर्थ येथे राज्यासह देश विदेशातून भाविक दर्शनासाठी येतात. येथील सहा ते सात कर्मचाऱ्यांची पगार मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते. परंतु तुटपुंज्या पगारातून घर चालत नसल्याने कर्मचाऱ्यांनी पगार वाढीची मागणी करीत संप करण्याचा इशारा दिला होता. २९ सप्टेंबर रोजी ट्रस्टला याबाबत कर्मचाऱ्यांनी सूचित केले होते. परंतु, मागणी मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या प्रकारामुळे भाविक, ग्रामस्थ संतप्त झाले असून, कारवाईच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सरपंच रामकिसन तांगडे, ,सुशील तांगडे, राजेंद्र तांगडे, देविदास तांगडे, पद्माकर तांगडे, नारायण तांगडे, भगवान तांगडे, गोपाल तांगडे, गौरव तांगडे, कृष्णा तांगडे यांची उपस्थिती होती.
बाळासाहेब तांगडे, सरपंच
पर्यटन ब दर्जा असलेल्या जांबसमर्थ गावातील समर्थ रामदास स्वामी यांच्या दर्शनासाठी चतुर्थीच्या दिवशी भाविक येतात. असे असतानाही विधिवत पूजा न झाल्याने व सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर बंद केल्याने भाविकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित ट्रस्ट विरोधात कारवाई करण्यात करावी.