सामान्य माणसामध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण करणार -पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे आश्वासन
जालना, (प्रतिनिधी)-
मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांच्याकडे पोलीस अधीक्षकाचा अतिरिक्त कार्यभार सोपावण्यात आला आहे.
कार्यभार स्वीकारल्यानंतर शैलेश बलकवडे अंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांना भेटायलाही जाणार आहेत. शैलेश बलकवडे हे 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी तीन ठिकाणी काम केलं आहे, यामध्ये गडचिरोली, नागपूर, कोल्हापूर आणि एसआरपीएफ प्रमुख म्हणून केलेल्या कामाचा समावेश आहे.
जालन्याच्या अधिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बलकवडे यांनी पत्रकार परिषद घेतली. मी पारदर्शकपणे काम करेन, वातावरण निवळण्यासाठी मी आलो आहे, माझ्याकडे हा तात्पुरता पदभार आहे, सामान्य माणसांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण करणार, असा विश्वास बलकवडे यांनी व्यक्त केला.
‘याआधी मी नागपूर ग्रामीण, गडचिरोली आणि कोल्हापूरमध्ये काम केलं आहे. जे झालं त्यानंतर नागरिकांमध्ये, पोलिसांमध्ये कॉन्पिडन्स बिल्डिंगसाठी इथे आलो आहे. जे घडलं त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सामान्य माणूस फोकस ठेवून काम करणार आहे. जे गैरसमज झाले, मनभेद झाले ते मिटवण्याचा आणि पोलीस प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे,’ असं बलकवडे म्हणाले.
‘जिथे जाणीवपूर्वक चूक झाली तिथे सूट मिळणार नाही, संपूर्ण माहिती घेऊन योग्य निर्णय त्या त्या वेळी घेण्यात येईल. चौकशी समितीचा भाग मी असेन की नाही माहिती नाही. सध्या जी जबाबदारी आहे ती पार पाडेन. जालनाकरांना, उपोषण सूरू असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना विनंती आहे, पोलीस आपल्यासाठी आहेत, माझ्या टीमवर विश्वास ठेवा. जे काम होईल ते योग्य होईल. चुकीचं काम होणार नाही,’ अशी ग्वाही शैलेश बलकवडे यांनी दिली.
‘मी अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे. आंदोलक जरंगे पाटील आणि नागरिकांची भेट घेणार आहे. नेमकं काय घडलं हे समजून घेणार आहे. भावना तीव्र असल्या तरी सर्व तरुण आणि समजूतदार नागरिकांना विनंती आहे, दळणवळण सुरू झालं पाहिजे. आता जाळपोळीच्या घटना 100 टक्के थांबल्या पाहिजेत,’ असं शैलेश बलकवडे म्हणाले.
‘घटनेच्या चौकशीसाठी अप्पर पोलीस महासंचालक येणार आहेत. गुन्हे मागे घेण्याचे अधिकार शासनाला आहेत. शासन यावर योग्य तो निर्णय घेईल, यापूर्वी शेतकरी आंदोलन तसंच सामाजिक आंदोलनावेळी शासनाने निर्णय घेतला आहे,’ असे प्रतिपादन शैलेश बलकवडे यांनी केले आहे