जालन्यात शुक्रवार रात्रीपासून तीन दिवस लागू शकते लॉकडाउन?
जालना शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उद्या शुक्रवारी मध्यरात्री पासून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रवींद्र बिनवडे हे उद्या शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी करण्याची शक्यता असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
जानेवारी 2021 पर्यंत जिल्ह्यात आटोक्यात असलेल्या करोना रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासून वाढण्यास सुरुवात झाली होती.चालू मार्च महिन्यात पहिल्या दिवसापासूनच रुग्णाच्या संख्येत भरमसाठ वाढ होत गेली आणि गेल्या आठ दिवसात जालना जिल्ह्यात विशेषतः जालना शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली आहे.फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून हळूहळू वाढत असलेल्या करोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी विविध उपाययोजना हाती घेत विशेष प्रयत्न केले.
परंतु या उपाययोजना नंतरही रुग्णसंख्या वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाऊन लावण्याची जिल्हा प्रशासनाची अजिबात मानसिकता नव्हती.मात्र वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासमोर आता दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याशी सल्लामसलत करून जिल्हाधिकारी बिनवडे यांनी उद्या शुक्रवारी मध्यरात्रीपासून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत म्हणजे तीन दिवस जिल्ह्यात पुर्णतः लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
त्याबाबतचे आदेश उद्या शुकवारी जारी करण्यात येणार असल्याची शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली आहे.