जालना जिल्हा

आस्थापना मालक व कामगाराना १ एप्रिल पासुन 45 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध करुन देण्यात येणार -पालकमंत्री टोपे

सर्व आस्थापनांनी येत्या दहा दिवसांमध्ये कामगारांची नोंदणी करावी पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

images (60)
images (60)

जालना, दि. 27 (न्यूज ब्युरो ):- जालना जिल्ह्यात मोठी औद्योगिक वसाहत आहे. तसेच जिल्ह्यात अनेक आस्थापना आहेत ज्या ठिकाणी हजारो कामगार काम करतात. या कामगारांसाठी जालन्यामध्ये कर्मचारी राज्य बिमा निगम (ईएसआयसी) चे एक मोठे रुग्णालय उभारण्याचा मानस आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी दहापेक्षा अधिक कामगार काम करत असलेल्या सर्व आस्थापनांनी ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीमध्ये दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी होत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते.

आणखी वाचा.....

यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, ईएसआयसीचे उपसंचालक चंद्रभान झा, संजीव यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, केंद्र शासनाच्या अखत्यारित असेलेले कर्मचारी राज्य बिमा निगम ईएसआयसी हे कामगारांना विविध सेवा, सुविधा देण्याचे काम करते. ज्या जिल्ह्यामध्ये 30 हजारापेक्षा अधिक कामगारांनी ईएसआयसीमध्ये नोंदणी केलेली आहे अशा ठिकाणी या मजुरांसाठी सर्व सुविधांनीयुक्त असे रुग्णालय उभारण्यात येते. जालना जिल्ह्यात मोठी औद्योगिक वसाहत असण्याबरोबर जिल्ह्याच्या आठही तालुक्यात 10 पेक्षा अधिक कामगार काम करत असलेल्या अनेक आस्थापना आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार कामगारांची ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्यात आलेली असुन केवळ 18 हजार कामगारांची नोंदणी करणे शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक काम करणाऱ्या सर्व आस्थापनांनी येत्या १० दिवसांमध्ये ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केले.ईएसआयसीच्या रुग्णालयातुन कामगारांना कॅशलेस पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार दिले जातात. या रुग्णालयातुन उपचार घेत असताना वैद्यकीय खर्चाची कुठलीही मर्यादा नसल्याने मोठमोठ्या आजारावरदेखील या ठिकाणी उपचार देण्यात येतात. ईएसआयसीमध्ये नोंदणी करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच अपघातामध्ये जर कामगाराचा मृत्यु झाला तर अशा कामगाराच्या कुटूंबियांना निवृत्तीवेतन देण्याबरोबरच इतरही सुविधा ईएसआयसीमार्फत देण्यात येत असल्याचे सांगत कामगार बांधवांना आधार देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी तसेच आस्थापनांच्या मालकांनी सामाजिक बांधिलकी जपत या रुग्णालयाच्या उभारणीसाठी हिरिरीने यामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केले.ईएसआयसीमध्ये आस्थापनांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची सुचना करत यामध्ये जिल्ह्यात दररोज किती आस्थापनांनी नोंदणी केली याचा दैनंदिन आढावा घ्यावा. नोंदणी करण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर आस्थापनांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. १ एप्रिल पासुन 45 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोरोनापासुन सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक आस्थापना मालक व त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यात कामगारांसाठी स्वतंत्र असे रुग्णालय उभारण्याचा पालकमंत्र्यांचा मानस असुन जिल्ह्याच्या व कामगारांच्यादृष्टीने अत्यंत चांगली बाब आहे. ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील आस्थपनांनी प्रशासनास द्यावी. नोंदणीसाठी आस्थापनांना प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल, असे सांगत याबाबत लवकरच कार्यशाळेचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असुन प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनापासुन वाचण्यासाठी प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच प्रत्येकाने मास्क सॅनिटायजरच्या वापराबरोबरच सामाजिक अंतराचे पालन या त्रिसुत्रीचा प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन करत लॉकडाऊनसंदर्भात व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मतेही यावेळी जिल्हाधिकारी बिनवडे यांनी जाणुन घेतली.
जिल्ह्यातील रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत याची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असता यावर जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात कोव्हीड बाधितांवर उपचार करण्यासाठी किती खाटा शिल्लक आहेत याची माहिती रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याबरोबरच एक नवीन ॲप विकसित करण्यात येत असुन जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध खाटांची माहिती ॲपद्वारे त्यांच्या मोबाईलवर लवकरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यात कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाबरोबरच तालुकास्तरावरही अत्यंत चांगल्या पद्धतीची व्यवस्था तयार करुन देण्यात आली आहे. तालुकास्तरावरही ऑक्सिजनबेड, व्हेंटीलेटरचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असुन कोरोनाची सौम्य व मध्यम लक्षणे आहेत व ज्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही अशा व्यक्तींनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी न येता सीसीसी अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाईन व्हावे. ज्या रुग्णांना खरच ऑक्सिजनची अथवा व्हेंटीलेटरची गरज आहे अशा रुग्णांनीची जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती व्हावे. तसेच कोरोना चाचणीसाठी स्वॅब देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांची गर्दी पहाता एसआरपीएफ क्वाटर्स येथे स्वतंत्रपणे स्वॅब संकलन केंद्र उभारण्यात आले असल्याचे सांगत नागरिकांनी कोरोनाची चाचणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी न करता एसआरपीएफ क्वाटर्स परिसरात स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या केंद्रात आपला स्वब देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी केले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, ईएसआयसीचे उपसंचालक चंद्रभान झा यांनीही व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीस प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!