जालना जिल्हा
अंबड येथील ग्रामीण रुग्णालय, कोव्हीड केअर सेंटरसह लसीकरण केंद्रास जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची भेट
रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याबरोबरच त्यांची अधिक चांगली काळजी घ्या
लस अत्यंत सुरक्षित : सर्वांनी लस टोचुन घेण्याचे आवाहन
न्यूज जालना, दि. 8
आज दि. 8 एप्रिल रोजी अंबड येथील कोव्हीड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय तसेच लसीकरण केंद्रास भेट देऊन रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याबरोबरच त्यांची अधिक चांगल्या प्रमाणात काळजी घेण्याचे निर्देश देऊन कोरोनावरील लस ही अत्यंत सुरक्षित असुन प्रत्येकाने ही लस टोचुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, अंबड येथील कोरोनाबाधित रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणीच उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण रुग्णालयात डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यात आले असुन या ठिकाणी ऑक्सीजन व आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना अखंडितपणे व योग्य दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा होईल यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश देत लिक्वीड ऑक्सिजनचे दोन ड्युरा सिलेंडर अंबडसाठी देण्यात आले असुन ते तातडीने कार्यान्वित करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कोव्हीड केअर सेंटरला भेट : रुग्णांशी साधला प्रत्यक्ष संवाद
अंबड येथील मुलांचे वसतीगृह येथे उभारण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट देत जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवादही साधला.या ठिकाणी आपणला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येतात काय, जेवणाचा दर्जा चांगला आहे काय, आपली आवश्यक ती तपासणी केली जाते काय आदी बाबींची अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी करत या ठिकाणी असलेल्या रुग्णांची कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. येणाऱ्या काळात अधिकचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यासाठी मुलींचे वसतीगृह येथे येत्या आठ दिवसामध्ये कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
लसीकरण केंद्राला भेट
अंबड शहरातील मत्स्योदरी विद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण केंद्रालाही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक्ष भेट देऊन लस घेणाऱ्या सर्वसामान्यांशी संवाद साधला. कोरोनापासुन बचाव करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली लस ही अत्यंत सुरक्षित असुन आपण स्वत:ही लस घेतली असुन अंबडमधील प्रत्येकाने ही लस टोचुन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन करा
कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन करण्याची गरज आहे. ब्रेक द चेन अंतर्गत प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे प्रत्येकाने तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.
यावेळी उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसिलदार बी.के. सेंडोल, डॉ. तलवाडकर, गटविकास अधिकारी श्री सुरडकर, डॉ. अग्रवाल, डॉ. श्रीमती बेलगे, पोलिस निरीक्षक श्री. हुंबे आदींची उपस्थिती होती.