जालना तालुका

‘नो-बॉल’वरून क्रिकेटच्या मैदानात वाद; मिलन चौकात दोन टीमचा मोठा राडा!..

ट्रॅपवर किरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर; कदीम जालना पोलिसांची तातडीने धाव..

उपसंपादक – बबनराव वाघ

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना

शहरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या क्रिकेट ट्रॅपवर प्रशासनाचा वचक कधी बसणार?..

जालना : क्रिकेट खेळताना ‘नो-बॉल’ आणि ‘डेड बॉल’च्या कारणावरून दोन टीममध्ये सुरू झालेला किरकोळ वाद काही वेळातच विकोपाला गेला. या वादाचे रूपांतर जुना जालना भागातील मिलन चौकात मोठ्या राड्यात झाल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमाव पांगविला, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळेस क्रिकेट खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘क्रिकेट ट्रॅप’ उभारण्यात आले आहेत. या ट्रॅपवर खेळण्यासाठी तासाच्या हिशेबाने शुल्क आकारले जाते. काही ठिकाणी तब्बल ६०० ते ८०० रुपये प्रतितास शुल्क घेतले जात असल्याची माहिती आहे. मात्र, खेळाच्या उत्साहात किरकोळ कारणांवरून खेळाडूंमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर थेट हाणामारीत होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
या घटनेतही क्रिकेटमधील ‘नो-बॉल’ आणि ‘डेड बॉल’च्या निर्णयावरून सुरू झालेला वाद मैदानाबाहेर पोहोचला आणि थेट मिलन चौकात दोन टीम आमनेसामने आल्या. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
रात्री दोन-तीन वाजेपर्यंत क्रिकेट; पालकांची चिंता वाढली
शहरातील अनेक क्रिकेट ट्रॅप रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलेही रात्रीच्या वेळेस क्रिकेट खेळण्यासाठी जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक मुले रात्री दोन-दोन, तीन-तीन वाजता घरी परतत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
एकीकडे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना दुसरीकडे अशाच किरकोळ कारणांवरून होणारे वाद कधी मोठ्या हाणामारीत किंवा गंभीर गुन्ह्यात रूपांतरित होतील, याची शाश्वती नाही.
आज ‘नो-बॉल’वरून वाद; उद्या जीवावर बेतला तर जबाबदार कोण?
किरकोळ कारणावरून वारंवार वाद आणि हाणामारी होत असल्याने पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने या क्रिकेट ट्रॅपकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ट्रॅपची तपासणी करून संबंधितांकडे आवश्यक परवानग्या आहेत का, अल्पवयीन मुलांना रात्री खेळण्यास परवानगी दिली जाते का आणि सुरक्षेच्या उपाययोजना आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर ‘किरकोळ वाद’ कधी मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे संबंधित क्रिकेट ट्रॅपचालकांना नोटिसा बजावून नियमांचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत आणि नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मिलन चौकातील मोठा अनर्थ टळला; मात्र या घटनेने शहरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या क्रिकेट ट्रॅपच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

न्यूज जालना YouTube व्हिडिओ

News Jalna YouTube चॅनेलला भेट द्या

न्यूज जालना Facebook पेज

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,894
वृत्तपत्रीय फोटो तयार होत आहे...
Back to top button
error: Content is protected !!