माहोरा बसस्थानक की अतिक्रमणांचा अड्डा? फूटपाथ गायब, रस्त्यावर दुकाने; प्रशासन झोपलेय का?

रिक्षाचालकांचे अड्डे, अनधिकृत वाहनांची गर्दी अन् व्यावसायिकांचे अतिक्रमण; शुक्रवारी चौक पार करण्यासाठी वाहनधारकांना लागतात तब्बल २० मिनिटे!
माहोरा | रामेश्वर शेळके
जाफराबाद तालुक्यातील माहोरा बसस्थानक परिसरात सध्या अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. कुठे रिक्षाचालकांचे अड्डे, कुठे अनधिकृत वाहनांची गर्दी, तर कुठे फूटपाथवर थाटलेली दुकाने… अशा परिस्थितीत बसस्थानक परिसरातून मार्ग काढणे म्हणजे वाहनचालकांसाठी कसरत आणि पादचाऱ्यांसाठी जीव मुठीत घेऊन चालण्यासारखे झाले आहे. अतिक्रमणांनी रस्त्याचा बहुतांश भाग व्यापल्याने माहोरा बसस्थानक परिसर अपघातांचा धोका वाढविणारे ठिकाण बनत आहे. मात्र, हे सर्व उघडपणे सुरू असतानाही पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
फूटपाथवर दुकाने, पादचारी रस्त्यावर!
नागरिकांच्या सुरक्षित पायी चालण्यासाठी असलेले फूटपाथ सध्या व्यावसायिकांच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे. अनेकांनी फूटपाथवरच दुकाने थाटली आहेत, तर काहींनी रस्त्यावर केळीच्या हातगाड्या आणि पानटपऱ्या उभ्या केल्या आहेत. परिणामी, पादचाऱ्यांना फूटपाथवरून चालण्याऐवजी थेट रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये अपघाताचा धोका वाढला असून, यापूर्वीही या परिसरात छोटे-मोठे अपघात घडल्याचे समोर आले आहे.
रस्त्याच्या कडेला दुकानदारी; रिक्षांचे अड्डे कायम!
विशेष म्हणजे, बसस्थानक परिसरातून बसेसची ये-जा होत असली तरी काही व्यावसायिकांनी आपली जागा सोडलेली नाही. स्टूल, टेबल रस्त्याच्या कडेला मांडून दुकानदारी सुरू आहे. काही एजंटांनीही फूटपाथवरच आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यात रिक्षाचालकांचे अड्डे आणि अनधिकृत वाहनांची भर पडत असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. बस वळविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत असून, प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
शुक्रवारी २० मिनिटांची वाहतूक कोंडी!
माहोरा येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या दिवशी परिसरात नागरिकांची आणि वाहनांची प्रचंड गर्दी होते. अतिक्रमणांमुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर बाजाराच्या गर्दीची भर पडल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडतो. चौकातून अवघे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना तब्बल १५ ते २० मिनिटे प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे बाजारासाठी येणारे नागरिक, प्रवासी आणि वाहनचालक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न नवीन नाही. तक्रारी आणि वाहतुकीतील अडथळे समोर येत असतानाही अतिक्रमणांवर ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. फूटपाथ मोकळे करणे, रस्त्यावरील अनधिकृत व्यवसाय हटविणे आणि वाहतुकीला शिस्त लावणे ही काळाची गरज बनली आहे.
नागरिकांचा सवाल एकच : माहोरा बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?
