महाराष्ट्र न्यूज

वीजग्राहकांना स्व:हून मीटर रीडिंग आता एस एम एस द्वारे पाठवण्याची सुविधा

 

images (60)
images (60)

न्यूज जालना ब्यूरो

महावितरणने मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेही मीटर रीडिंग पाठवण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात सध्या संचारबंदी सुरू आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही वीजग्राहकांना महावितरण मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही सोय कायम ठेवून महावितरणने आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेही ग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्टफोन नाही अशा ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकही नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे रीडिंग पाठविता येईल. सोबतच या चार दिवसांमध्ये आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेही मीटर रीडिंग पाठवता येणार आहे.

‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रीडिंग पाठवण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवणे आवश्यक आहे. वीजग्राहकांनी MREAD असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. १२ अंकी ग्राहक क्रमांक १२३४५६७८९०१२ हा असल्यास व मीटरचे KWH रीडिंग ८९५० असे असल्यास MREAD १२३४५६७८९०१२ ८९५० या प्रकारचा ‘एसएमएस’ पाठवायचा आहे. चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रीडिंग स्वीकारण्यात येणार नाही व ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणार आहे.

वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठवण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्वतःहून रीडिंग पाठवल्यास मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावरही नियंत्रण राहील. रीडिंगनुसार वीजबिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तात्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. मीटर रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील. शंका-समाधानासाठी तक्रार करता येईल. या व इतर विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!