मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले…
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघातील खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत जरांगे पाटील यांचं उपोषण तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी विनंती केली आहे.
बजरंग सोनवणे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण व तद्अनुषंगिक मागण्यांची पूर्तता होण्यासाठी मौजे अंतरवली सराटी ता. अंबड जि. जालना येथे दिनांक १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांची प्रकृती खालावलेली आहे. खालावत चाललेल्या प्रकृतीची दखल घेऊन सदरील उपोषण तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात,” अशी विनंती खासदार सोनवणे यांनी केली
वातावरणात तणाव, तोडगा निघणार?
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही जरांगेंची मागणी आहे. त्यासाठी गेल्या ६ दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरू आहे. शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी बीड, धाराशिव जिल्ह्यात बंदची हाक दिली होती.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. उपोषणाच्या ५ व्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली होती. त्यानंतर रात्री उशिरा वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेल्या ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली.
जालनातील वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहे. त्याठिकाणापासून ३ किमी अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. अंतरवालीकडे जाणाऱ्या मार्गावरच ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू असल्याने इथं मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात.