पारंपरिक धनगर समाज वेशभूषा ठरलेली “महाराष्ट्राची स्वप्नसुंदरी
प्रतिनिधी/अंबड
ग्रामीण भागातील महिलांमध्ये ही विशेष कलागुण असतात. हस्तकला, लज्जतदार ग्रामीण पदार्थ बनवण्या बरोबरच,मराठी संस्कृतीस साजेशी पारंपारिक वेशभूषा व सुंदरता विशेष करून पाहावयास मिळते.
आणि याच विशेष कला गुणांमुळे अंबड येथील शिक्षिका सौ. विजयमाला अनिल भालेकर या राज्यस्तरीय महाराष्ट्राची स्वप्नसुंदरी स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर विजयाच्या मानकरी ठरले आहेत.
अस्सल धनगरी वेशभूषा परिधान करून, महाराष्ट्राची पारंपरिक अस्मिता जपत त्यांनी हा विजय संपादित केला आहे. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय महिला व बालीकांसाठी विशेष स्पर्धा आयोजित केली गेली होती. संपूर्ण सप्ताहभर महिलांमधील असणाऱ्या कलागुणांना वाव देणारी ही स्पर्धा ठरली.
या स्पर्धत सौ.विजयमाला अनिल भालेकर यांनी धनगर समाजाची पारंपरिक, मेंढपाळ महिलांची वेशभूषा करून आयोजकांचे लक्ष वेधून घेतले. आणि राज्य पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले.
त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी विशेष कार्य करण्यासाठी या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या धनगर समाज मेंढपाळ माता भगिनींना हा पुरस्कार समर्पित असल्याचे सौ. विजयमाला अनिल भालेकर यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्राची पारंपरिक अस्मिता जपत व पुरातन वेशभूषेला आजच्या आधुनिक युगात प्रकाशझोतात आणण्याचा सौ.विजयमाला भालेकर यांचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. यामुळे ग्रामीण परंपरेला नक्कीच प्रोत्साहन मिळेल यात शंका नाही.