मराठवाड्यातील संयमी, उमदे तरूण नेतृत्व हरपले ः अर्जुन खोतकर
जालना (प्रतिनिधी) ः देशाची राजधानी दिल्ली येथे मोठे वजन ठेवणारा मराठवाड्यातील संयमी आणि उमदे तरूण नेतृत्व स्व. खा. राजीव सातव अचानकपणे आपल्यातून निघून गेल्यामुळे महाराष्ट्र राज्याची मोठी हानी झाली आहे. ती भरून निघने अशक्य असल्याचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आज बुधवार रोजी आयोजीत शोक सभेत सांगीतले.
स्व. खा. राजीव सातव यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी हुतात्मा स्मारक टॉऊनहॉल जुना जालना येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री खोतकर हे बोलत होते. शोक सभेच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. पुढे बोलतांना श्री खोतकर म्हणाले की, खा. राजीव सातव यांनी आपल्या अभ्यासू आणि कुशल नेतृत्वामुळे देशाची राजधानी दिल्ली येथे महाराष्ट्रात दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या अचानकपणे जाण्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचे फार मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. खा. राजीव सातव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पित करतांना म्हणाले की, स्व. खा. राजीव सातव हे प्रेरणादायी नेतृत्व आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अत्यंत जवळचे होते. त्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पक्ष श्रेष्टीकडे जाण्याचा मोठा मार्ग होता. परंतू त्यांच्या जाण्यामुळे सामान्य कार्यकर्ता हा खचून गेला आहे आणि त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईश्वर त्यांच्या कुटूंबाला हे दुःख पेलण्याची शक्ती प्रदान करो अशा भावना विवश शब्दात श्री देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पित केली. शिवसेनेचे जालना जिल्हा प्रमुख भास्करराव अंबेकर यांनी श्रद्धांजली अर्पित करतांना सांगीतले की, स्व. खा. राजीव सातव यांनी आवघ्या 47 वर्षामध्ये आपल्या संर्घषमय जिवनातून देश पातळीवर नेतृत्व केले आणि राजकारणामध्ये आपला वेगळा ठसा निर्माण करून संयम, प्रगल्भता, कुशल संघटनच्या माध्यमातून राजकारणाबरोबर समाज कारणावर त्यांनी जास्त भर दिला होता. यामुळे राज्यासह देशामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग त्यांनी निर्माण केला होता. अ.भा.काँ. चे सदस्य भिमराव डोंगरे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगीतले की, स्व. खा. राजीव सातव यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर संपुर्ण राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते शोकमग्न झाले. आहेत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांनी राज्यामध्ये उभी केली होती. काँग्रेस पक्ष अशा कर्तबगार नेतृत्वाला कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकबाल पाशा, भाजपाचे शहराध्यक्ष राजेश राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साईनाथ चिन्नादोरे यांनी स्व. खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पित करतांना सांगीतले की, मराठवाड्यातील एक अभ्यासू आणि दुरदृष्टी असणारा नेता हरपल्यामुळे मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख हे श्रद्धांजली वाहतांना अत्यंत भावूक होवून त्यांच्या डोळ्यातून अश्रूृच्या धारा वाहत होत्या. स्व. खा. राजीव सातव आणि राजेंद्र राख हे गुजरातच्या निवडणूकीत एकत्रीतपणे काम करीत असतांना त्यांनी त्या ठिकाणी घडलेल्या घटनांचा उल्लेख करीत खा. राजीव सातव यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना कसा जीव लावला त्याबद्दल बोलतांना त्यांना गहिवरून आले. भावना विवश होवून जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सत्संग मुंढे यांनी केले ते म्हणाले की, मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी नेहमी खा. राजीव सातव हे अग्रेसर होते. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी राज्यासह देशाच्या राजकारणात सक्रिय व्हावे अशी त्यांची भावना होती. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्ते देशाच्या अन्य राज्यात पक्षाच्या कार्यासाठी निवडले होते. परंतू त्यांच्या जाण्यामुळे मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज संपुर्ण देशामध्ये स्व. खा. राजीव सातव यांच्या मृत्यूमुळे हळहळ करीत असल्याचे श्री मुंढे यांनी सांगीतले. याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, पंडीत भुतेकर, ॲड. संजय काळबांडे, डॉ. विशाल धानुरे, सुभाष कोळकर, राजेंद्र जैस्वाल, संतोष जमधडे, संजय देठे, चंद्रकांत रत्नपारखे, तय्यब देशमुख, मोहन इंगळे, संदीप मगर, विनय वाहुळे, ॲड. रोहित बनवसकर, रमेश मुळे, सोपान सपकाळ, ज्ञानेश्वर कदम, फकीरा वाघ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.