जालना जिल्हा

मोदी सरकारने सात वर्षात देश काळोखात घातला ः राजाभाऊ देशमुख


पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्याने महागाईने कळस गाठला ः आ. राठोड
जिल्हा काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने
जालना (प्रतिनिधी) ः केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने गेल्या सात वर्षामध्ये देशाला दिवाळखोरीत काढून जनसामान्यांचे जगणे कठीण करून ठेवले आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्यामुळे तरूण वर्ग सैरभैर झाला आहे. मोदी सरकारच्या एकुण काळ्या कारकीर्दीचा रविवार रोजी जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करून जोरदार निदर्शने करण्यात आले.
जुना जालना येथील गांधी चमन येथे केंद्रातील भाजप मोदी सरकारच्या विरोधात जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करतांना सांगीतले की, गेल्या सात वर्षामध्ये देश अंधाराच्या खाईत जावून पडला आहे. शेतकरी-कष्टकऱ्यांचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जीएसटीचे अफलातून धोरण अवलंबिल्यामुळे व्यापारी तसेच छोटा व्यवसायीक मोठ्या अडचणीत सापडला आहे.
आमदार राजेश राठोड यांनी केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करत देशात पेट्रोल व डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. यामुळे सामान्य माणूस अडचणीत सापडला असून महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. केंद्र शासनाने शेतकरी आंदोलनाचा कानाडोळा केल्यामुळे गेल्या सहा महिण्यापासून शेतकरी दिल्ली येथे तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी ठाण मांडून बसला आहे. परंतू केंद्र शासन जाणून बुजून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे आ. श्री राठोड यांनी सांगीतले.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख म्हणाले की, केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे देशात कोरोना महामारी पसरली त्यामुळे हजारो लोकांचे निष्पाप बळी गेले आहेत. याला मोदी सरकार जबाबदार आहे. मोदी सरकारने कोरोना महामारीला गांभीर्याने घेवून वेळीच अवर घातला असता तर देशामध्ये हजारो लोकांचे प्राण वाचले असते असे सांगुन केंद्र शासनाचा त्यांनी निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रा. सत्संग मुढे, विजय कामड, दिनकर घेवंदे, राहुल देशमुख, ॲड. राहुल चव्हाण यांनी केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करत आपल्या भाषणातून केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणावर चौफेर हल्ला करत  केंद्र शासनाच्या कुचकामी कार्यभाराचा निषेध व्यक्त केला.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक  करतांना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या सात वर्षामध्ये अल्पसंख्यांक आणि आदिवाशी व अनुसूचित जाती जमातीच्या अनेक योजना रखडून ठेवल्या आहेत यामुळे तळागळातील लोकांचा विकास खुटंलेला आहे. केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत द्वेष भावना ठेवून वागत असल्यामुळे देशातील विरोधक देखील हतबल झाला आहे. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या काळ्या कार्याचा निषेध नोंदविला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस राम सावंत, चंद्रकांत रत्नपारखे, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, निळकंठ वायाळ, बदर चाऊस, राधेश्‍याम जैस्वाल, गुरूमितसिंग सेना,   फकीरा वाघ, सोपान सपकाळ, नदिम पहेलवान, रहिम तांबोळी, गोपाल चित्राल, जावेद अली, गणेश वाघमारे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे अण्णासाहेब खंदारे यांनी आभार मानले. 

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!