केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व पालकमंत्री राजेश टोपे यांनी घेतला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा संयुक्त आढावा
जालना, दि. 31 जालना जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी संयुक्तरित्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी श्री कोरडे, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसेय्यै, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप, अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. परंतु यंत्रणेने गाफील न राहता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शासनाने 15 जुनपर्यंत निर्बंधामध्ये वाढ केली असुन त्याचे पालनही शासनाच्या निर्देशानुसार होईल, यादृष्टीने आवश्यक ती दक्षता घ्यावी. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्के तर अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण 30 टक्के राहील याचीही दक्षता घेण्यात यावी. ग्रामीण भागामध्ये बाधित असलेले व्यक्ती कोव्हीड केअर सेंटरमध्ये येण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. वेळप्रसंगी पोलीस विभागाची मदत घेण्यात येऊन त्यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या. कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व सोयीसुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णांची दररोज 6 मिनिट वॉकटेस्ट घेण्यात यावी, अशा सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा पातळीपेक्षा तालुकापातळीवर निर्बंधांचे कडकरित्या पालन होत नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे तालुकापातळीवर निर्बंधाची कडक अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच कोरोनासंशयित अथवा बाधितांना गृहविलगीकरणामध्ये न ठेवता त्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे. तसेच कोरोनाच्या तीसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जालना जिल्ह्याला कुठल्याही बाबींची उणीव भासणार नाही यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, ग्रामीण भागात तपासणीमध्ये नागरिकांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतरही ते कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल न होत नाहीत. अशावेळी नागरिकांना या आजाराचे परिणाम समजावुन सांगुन त्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात यावे. कोरोनापासुन बचावासाठी मास्क, सॅनिटायजर, सामाजिक अंतराचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर वावरताना दिसतात. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
कोरोनानंतर सर्वसामान्याला म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करावा लागत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये या आजारावर मोफत उपचारासाठी समावेश करण्यात आला असुन या रुग्णांकडून उपचारापोटी पैसे तर घेतले जात नाहीत ना याची तपासणी करण्यात यावी. तसेच कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी दवाखान्यात उपचारापोटी मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्या जाते. शासनाने ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारली जाऊ नये यासाठी प्रत्येक दवाखान्यात नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षकांनी काटेकोरपणे देयकांची तपासणी करण्याच्या सुचनाही केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.