पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा
घनसावंगी प्रतिनिधी/नितीन तौर
घनसावंगी:येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे यांना आज (दि.१४) सोमवार रोजी निवेदन देण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्य किशोर शिंदे, राजकुमार वायदळ, नरेंद्र जोगड, अविनाश घोगरे,यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते.
जाफराबाद येथील दै.पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या भ्याड हल्लाचा तीव्र निषेध नोंदवून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी घनसावंगी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने आज दि.१४ सोमवार रोजी घनसावंगी चे तहसीलदार नरेंद्र देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पतंगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ११ जून रोजी जाफराबाद पंचायत समिती कार्यालयासमोर पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर काही समाजकंटक वाळु माफियांनी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला केला.यात ज्ञानेश्वर पाबळे यांच्यासह सोबत असलेले इतर काही जण या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहे.जखमी व्यक्तींवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.तर पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांना औरंगाबाद येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या वर उपचार सुरू आहे.गेल्या मागील वर्षभरापासून वाळु माफियांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे.
समाजहितासाठी पत्रकारांनी अवैध वाळू उत्खननाची बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्यामुळे यांचा इतर पत्रकारांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.दिवसेंदिवस या घटनेत वाढ होत असून भरदिवसा वाळू चोरीचा सर्रास प्रकार सुरू आहे.अशा अवैधरीत्या वाळु वाहतूक करणाऱ्या विरोधात पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे व देळेगव्हाण येथील दै.लोकमत चे प्रतिनिधी चंद्रकांत पंडीत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाचा तीव्र निषेध व्यक्त करत पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत संबंधित वाळू माफियांवर गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करुन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
या निवेदनावर पत्रकार संघाचे घनसावंगी तालुकाध्यक्ष किशोर शिंदे,राजकुमार वायदळ, नरेंद्र जोगड,अविनाश घोगरे,गणेश ओझा,भागवत बोटे,कौतिक घुमरे,मारोती सावंत, नवनाथ मोगरे,अभिषेक दुकानदार, लक्ष्मण बिलोरे,अजय गाढे,संभाजी कांबळे,अनिल गायकवाड यांच्यासह आदींची सह्या आहेत.