तंत्रज्ञान

राजणी च्या वासंती मुळजकर यांनी पुण्यात स्थापन केली सॉफ्टवेअर कंपनी


रांजणी न्यूज
या जगात सर्व काही असूनही देशोधडीला गेलेल्या व्यक्ती व संस्थांची कमतरता नाही. मात्र विविध संकटावर मात करुन काही व्यक्ती जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर समाजातील नागरीकांना प्रेरणा देणा-या ठरतात यात शंका नाहीं. यापैकीच एक व्यक्तीमत्व म्हणजे वासंती मुळजकर (देशपांडे) होय.
वासंती मुळजकर यांचा जन्म जालना जिल्ह्यातील रांजणी या लहान गावात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रांजणी येथेच झाले. शिक्षणासाठी त्यांना नेहमीच आर्थिक व मानसिक संकटांचा सामना करावा लागला. परंतु स्वतःच्या कुटुंबाबरोबरच समाजाने आपल्याकडून काही प्रेरणा घ्यावी ही जिद्द बाळगून काही विशेष कार्य करण्याचा संकल्प वासंती मुळजकर यांनी घेतला होता. त्यांचे माहेरचे नांव “वासंती अरविंद देशपांडे” होते. त्यांनी MCM (Master in Computer Management) पर्यंतचे शिक्षण लग्नाआधी पूर्ण केले. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की शिक्षणादरम्यान, स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी पार्टटाइम नोकरी केली. श्री. मनोज मुळजकर यांच्याशी मे २००७ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि त्या पुण्याला स्थलांतरित झाल्या. लग्नानंतर त्यांनी नोकरी करत असताना पी.जी.डी.बी.एम. पूर्ण केले. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे त्यांना आपली नोकरी सोडावी लागली.
नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांनी पुन्हा करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत सॉफ्टवेअर उत्पादनांचे विश्लेषण सुरू केले. ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रवेश, करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक कर्जातील अडचणी लक्षात घेऊन त्यांनी एक वेब-साईट विकसित केली. त्यासाठी त्यांनी ऑगस्ट 2017 मध्ये VM3 Tech Solutions LLP कंपनीची स्थापना केली. learningtelescope.com च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील सुमारे 450 व्यावसायिक महाविद्यालयांशी संपर्क साधला. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे 5000 विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यापुढेही त्यांनी आपली शिकण्याची जिद्द चालूच ठेवली आणि अनेक गूगल सर्टिफिकेशन्स पूर्ण केले.


जानेवारी 2020 पर्यंत जवळजवळ 30 समाधानी ग्राहक, 45 प्रोजेक्ट पूर्ण झाले आणि व्यवसायाने गती घेतली.
फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी लेखिका आम्रपाली महाजन यांच्यासोबत मराठी आणि इंग्रजी साहित्यावर आधारित “dureghi.com -‘दुरेघी'” अशी वेबसाईट चालू करण्याचा निर्णय घेतला. मुख्यतः साहित्य आणि कला ह्यांना डिजिटल माध्यमांवर प्रसार करणे हे ‘दुरेघी” चे मुख्य उद्दीष्ट असल्याचे वासंती मुळजकर यांनी सांगितले. “dureghi.com” ही वेबसाईट 25 मार्च 2020 रोजी “गुढी-पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाचकांसाठी चालू करण्याचा वासंती मुळजकर यांचा मानस होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सध्या लांबणीवर पडल्याचे त्यांनी सांगितले. रांजणी सारख्या ग्रामीण भागातून विविध संकटावर मात करुन यशस्वी होणा-या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची सर्वत्र कौतुक होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक