मंठा पंचायत समिती आग शॉर्टसर्किट नव्हे तर कारस्थान असल्याचा लोणीकरांचा आरोप
मंठा पंचायत समितीला लागलेल्या आगीची “डीवायएसपी किंवा एलसीबी” मार्फत चौकशी करून संबंधितावर कठोरातीकठोर कारवाई करा – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे पोलीस अधिक्षक यांना पत्र
मंठा/ रमेश देशपांडे
दिनांक १० ऑगस्ट रोजी मंठा पंचायत समिती कार्यालयातील एमआरईजीएस विभागाला लागलेल्या आगीमध्ये घरकुलाच्या फाईल, एमआरईजीएस चे मस्टर, सिंचन विहिरीच्या फाईल, शोषखड्डे फाईल, गाय गोठ्याच्या फाईल, शौचालयाच्या फाईल इत्यादी जळून खाक झाल्या आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे नव्हे तर हेतुपुरस्सर योजनाबद्ध रीतीने आखलेले कारस्थान असल्याचा संशय तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट घेऊन व्यक्त केला आहे. मंठा पंचायत समितीला लागलेल्या आगीची “डीवायएसपी किंवा एलसीबी” मार्फत चौकशी करून संबंधितावर कठोरातीकठोर कारवाई करा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिक्षक जालना यांना पत्र लिहून केली आहे.
सरपंच संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ पंचायत समिती सभापती शिल्पा नरेंद्र पवार उपसभापती नागेश घारे जिल्हा परिषद सदस्य रोहिणी पंजाबराव बोराडे रेणुका शिवदास हनवते विष्णू फुपाटे पंचायत समिती सदस्य स्मिता राजेश म्हस्के यमुना दत्तराव कांगणे नाथराव काकडे यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचे लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव पवार व गटविकास अधिकारी यांच्यातील वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याची शंका देखील व्यक्त केली जात आहे या प्रकरणी ऍट्रॉसिटी व ३५३ अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती मिळाली आहे हे दोन्ही प्रकरणांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
आपण व्यक्तिशः या प्रकरणात लक्ष देऊन डीवायएसपी किंवा एलसीबी मार्फत संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून मुळ सूत्रधार कोण? याचा शोध घ्यावा व त्यावर कठोरातीकठोर कारवाई करावी. अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिक्षक जालना यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.