शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे खुर्द पांगरीच्या ग्रामस्थांनी मांडली व्यथा
…. (अतिवृष्टीग्रस्तांना दिला दिलासा ; तात्काळ निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा दिला शब्द)…..
मंठा/ प्रतिनिधी :शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव यांनी मंठा तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बुधवार ता.4 रोजी शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विरोधीपक्ष नेते ना. अंबादास दानवे, खा. संजय जाधव यांनी खुर्द पांगरी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत असा दिलासा दिला.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती ए जे बोराडे, भास्कर आंबेकर, संजय लाखे पाटील, अनिरुद्ध खोतकर, गोपाळराव बोराडे, नितीन जेथलिया, ॲड. पंकज बोराडे, कल्याणराव बोराडे, अंकुशराव अवचार, बबनराव गणगे, अजय अवचार, सुदर्शन सोळंके, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. यावेळी ग्रामस्थांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. ग्रामस्थांना घरदार सोडावे लागले, लेकराबाळांना सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी जावे लागले.
असे सांगताना ग्रामस्थांना अक्षरशा रडू कोसळले. शेती पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले तर घरात पाणी गेल्यामुळे अन्नधान्य वाहून गेले अशी कैफियत ग्रामस्थांनी मांडली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या निवाऱ्याची तात्काळ व्यवस्था करणार असल्याचे सांगून गावातील पुलाचा व रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.