जालना जिल्ह्यातुन जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी संपन्न
न्यूज जालना | ब्युरो
नागपुर हायस्पीड रेल्वे प्रकल्प जालना जिल्ह्यातुन जात असुन त्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जालना व बदनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत जनसुनावणी आज संपन्न झाली.
या प्रकल्पाविषयी माहिती देताना हायस्पीड रेल्वेचे श्री शर्मा म्हणाले, मुंबई ते अहमदाबाद नंतर मुंबई-नागपुर हा दुसरा एचएसआर (हायस्पीड रेल्वे) प्रकल्प असुन याची लांबी 739 किलोमीटर एवढी असणार आहे.
महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधुन हा प्रकल्प जात असुन जालना जिल्ह्यात या प्रकल्पाची लांबी 42.8 किलोमीटर एवढी असणार असुन यामध्ये जालना तालुक्यातील 14 गावे व बदनापुर तालुक्यातील 9 अशी एकुण 23 गावे बाधित होत आहेत. जालना जिल्ह्यातुन जाणाऱ्या प्रकल्पासाठी एकुण 74.99 हेक्टर जमीनीची आवश्यकता असुन यामध्ये शासकीय 53.55 हेक्टर तर 21.44 खासगी जमीनीची आवश्यकता भासणार असल्याची माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, जनसुनावणी दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या व अडचणींची नोंद प्रशासनामार्फत घेण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी या प्रकल्पामुळे बाधित होतील, अशा शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी व समस्या रेल्वे प्रशासनाकडे पोहोचविण्यात येतील. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच त्यांच्या जमीनी खरेदी करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी सांगितले.
या जनसुनावणीस जालना व बदनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांसह, गटविकास अधिकारी, तहसिलदार आदींची उपस्थिती होती.