जालना जिल्हा

जालना जिल्ह्याचे चित्र बदलवून विकास कामास जालना प्रथमस्थानी राहिल:रावसाहेब दानवे

जालना शहरात विविध प्रभागात तसेच इतर विकासाची कामे मिळून सुमारे 90 कोटी रूपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ

जालना (प्रतिनिधी) ः राज्य, केंद्र सरकारसह जालना नगर पालिकेने एकत्र येवून विकास कामांच्या संदर्भात नियोजन केले तर विकासाच्या बाबतीत मागास असलेल्या जालना जिल्ह्याचे चित्र बदलवून विकास कामास आपला जिल्हा प्रथमस्थानी राहिल असा विश्‍वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज रविवारी येथे बोलतांना व्यक्त केला. गेल्या काही वर्षापासून संथ गतीने सुरू असलेले ड्रायपोर्टचे काम लवकरच पुर्ण करून या वर्षापासून ड्रायपोर्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

images (60)
images (60)


जालना रेल्वे स्टेशन जवळील भुयारी पुलाच्या कामासह जालना नगर पालिकेच्या वतीने शहरातील विविध प्रभागात सुमारे 30 कोटी रूपये खर्चुन करण्यात येणाऱ्या 39 विकास कामांचा शुभारंभ तसेच नविन व जुना जालन्याला जोडणाऱ्या नविन पुलाचे लोकापर्ण आज रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे होते तर आ. कैलास गोरंट्याल, आ. नारायण कुचे, नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, उपनगराध्यक्षा अन्सारी फरहाना अ. रउफ, बांधकाम सभापती सौ. सय्यद फरहीन अजहर, माजी नगराध्यक्ष बबलु चौधरी, भाजपा शहराध्यक्ष राजेश राऊत, गटनेते अशोक पांगारकर आदिंची यावेळी व्यासपिठावर उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलतांना श्री दानवे पाटील म्हणाले की, आपण केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असलो तरी जालना शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी केेंद्र शासनाकडून जो काही निधी आणता येईल तो आणण्यासाठी आपण निश्‍चितपणे प्रयत्न करणार आहे. राजुर रस्त्याचा संदर्भ देत ते आपल्या भाषणात म्हणाले की, जालना ते राजुर पर्यंत या रस्त्याचे चार आमदार वाली असले तरी सदर रस्ता खराब झाला की त्याचे सगळे खापर आणि आरोप प्रत्यारोप मात्र माझ्यावरच होत असतात. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत या रस्त्याच्या मुद्यामुळे मला पंधरा हजार मतांचा फटका बसला होता. तेव्हापासून जालना – राजुर या रस्त्याकडे आपण विशेष लक्ष दिले आहे. या रस्त्याच्या कामासाठी नुकताच 250 कोटी रूपयांचा तर राजुर- फुलंब्री या रस्त्याच्या कामासाठी 60 कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला असल्याचे दानवे यांनी आवर्जुन सांगीतले.


जालना शहराच्या विकासासाठी तत्कालीन खासदार स्व. अंकुशराव टोपे यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच प्राधान्य दिले होते. या शहराच्या विकासासाठी आमची देखील बांधीलकी असून ती येणाऱ्या कालावधीत देखील कायम राहील असा विश्‍वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. ते म्हणाले की, नविन व जुना जालना या भागाला जोडल्या जाणाऱ्या या नविन पुलाची रूंदी आणखी वाढविण्याची गरज आहे.

शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनानाकडून भरीव निधी उपलब्ध करून या निधीच्या माध्यमातून विकास कामे केली जात आहे. मात्र शहर वासियांच्या विकासाच्या बाबतीत अनेक अपेक्षा आहेत. त्या सोडविण्यासाठी व शहराच्या सर्वांगीन विकासासाठी आपण समर्थपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगुन जालना पालिकेने विकासाच्या दिलेल्या प्रस्तावांना सकारात्मक घेवून विकास कामांसाठी साथ दिली आहे. अमृतवन उद्यान, छत्रपती संभाजी उद्यानासह शहरातील विकास कामांसाठी जो काही निधी आवश्‍यक असेल तो उपलब्ध करून देण्याची आपली तयारी असल्याची ग्वाही टोपे यांनी आपल्या भाषणातून दिली.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे त्या त्या प्रभागातील नगरसेवक व प्रतिष्ठीत मान्यवरांनी शाल – श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. कार्यक्रमास नगरसेवक विजय चौधरी, महाविर ढक्का, रमेश गौरक्षक, संजय भगत, सौ. शिक्षाताई ढक्का, राधाकिशन दाभाडे, नंदकिशोर गरदास, राधाकृष्ण कोताकोंडा, वाजेद पठाण, जगदीश भरतीया, अशोक भगत, विशाल बनकर, सिध्दीविनायक मुळे, शहा आलमखान, अरूण मगरे, सौ. आशा ठाकूर, विष्णू वाघमारे, किशोर गरदास, राजेंद्र वाघमारे, आरेफ खान, आमेर पाशा, हरिष देवावाले, राहुल हिवराळे, सौ. संगीता पाजगे, सय्यद अजहर, नजीब लोहार, सोनु सामलेटी, संतोष काबलीये, ॲड. सय्यद तारेख, जालना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव, राजेंद्र जाधव, विक्रांत ढक्का, विलास पवार, राजु पवार, सांडु पवार, सुभाष करंडे, नंदु परदेशी, नारायण ठाकुर, यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हेोते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार राम सावंत यांनी मानले.

संस्कारातील फरक जनतेला कळतो
आ. गोरंट्याल यांचा विरोधकांना टोला

जुना जालना आणि नविन जालना या दोन्ही भागातील लोकांची मनं जोडण्याचे काम नविन लोखंडी पुलामुळे झाले आहे. परंतू काही लोकांनी या पुलाचे परस्पर उद्घाटन करून लोकांची मनं तोडण्याचे काम केले आहे. बाप आमच्या बापापर्यंत तर मुलगा थेट खानदानापर्यंत टिका करत आहेत. आम्हाला देखील जशास तसे प्रत्युत्तर देता आले असते परंतू आमच्या आई-वडीलांनी आमच्यावर आणि आम्ही आमच्या मुलावर चांगले संस्कार टाकले आहेत. हा संस्कारातील फरक जनतेला चांगला कळतो असा टोला आ. कैलास गोरंट्याल यांनी विरोधकांना नाव न घेता लगावला आहे. यावेळी बोलतांना आ. गोरंटयाल यांनी सांगीतले की, जालना शहरात विविध प्रभागात तसेच इतर विकासाची कामे मिळून सुमारे 90 कोटी रूपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ होत असून या कामांसाठी सर्वोतोपरी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि पालकमंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानले आहे. आज लोकापर्ण होत असलेल्या लोखंडी पुलाचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून शेजारी असलेल्या छोट्या पुलाच्या कामाचा देखील श्री दानवे आणि श्री टोपे यांच्याहस्ते शुभारंभ होत असल्याचे सांगुन आपण कुणावर टिका टिप्पनी किंवा आरोप प्रत्यारोप करण्याला महत्व न देता जालना शहर व मतदार संघातील विकासावर भर दिला त्यामुळेच मतदार संघातील जनतेने आपल्याला तब्बल 26 हजारांचे मताधिक्य देऊन विजयी केल्याचे आ. गोरंट्याल यांनी शेवटी सांगीतले. जनतेचा हा विश्‍वास पुढील काळात देखील कायम राहिल यासाठी आपण कटिबध्द असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!