कुंभार पिंपळगाव बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य!
शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या जीवावर घनसावंगी मार्केट कमिटीने कमवलेले कोट्यावधी रूपये गेले कुठे ?
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
जालना जिल्ह्यातील घनसावंगी कृषि उत्पन्न बाजार समितीने मागील काही वर्षांत शेतकरी व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कमवलेले कोट्यावधी रूपये गेले कुठे असा सवाल सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना पडला आहे.




घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे कृषि उत्पन्न बाजार समितीची मुख्य बाजारपेठ आहे. अर्थात जवळपास सर्व कामकाज येथूनच चालते. कृषि उत्पन्न बाजार समितीला कुंभार पिंपळगांव येथे अनेक एकर जमीन आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मागील काळात कृषि उत्पन्न बाजार समितीने अंबड – पाथरी रोडवर व्यापारी गाळे बांधले व त्यांना 99 वर्षांच्या कराराना जवळपास कमी अधिक असे 20 लाख प्रत्येकी गाळा विक्री केला आहे.
कृषि उत्पन्न बाजार समितीचे जवळपास 36 गाळे आहेत, सरासरी एक गाळ्याची विक्री किंमत 15 लाख जरी धरली तरी ही रक्कम 5 कोटीच्या पुढे चालली आहे. शिवाय दर बुधवारी कुंभार पिंपळगांवचा आठवडी बाजार असल्याने याच मार्केट कमिटीच्या परिसरात दर बुधवारी बैलांचा बाजार भरतो, त्याची फी वसूल होते. तसेच कोट्यावधी रूपयांची भुसार मालाची खरेदी विक्री सुध्दा याच मार्केट कमिटीच्या कंपाउंड मध्ये होते, तेथुनही कृषि उत्पन्न बाजार समितीला मोठी रक्कम मिळते.
शिवाय कापसाच्या गाड्यांच्या माध्यमातूनही कृषि उत्पन्न बाजार समिती भरपूर पैसे मिळतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा व समर्थ सहकारी बँकेची शाखा मार्केट कमिटीच्या यार्डातच आहे.अर्थातच त्यांना यांचे चांगले भाडे मिळते. मात्र एवढी कमाई होवून सुध्दा शेतकरी व व्यापाऱ्यांना कुठलीच सुविधा नाही. शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही, पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृह नसल्यामुळे लोक उघड्यावर शौचाला जातात, तसेच कुठेही लघुशंका करतात, ज्या व्यापाऱ्यांनी कोट्यावधीची कमाई कृषि उत्पन्न बाजार समितीला दिली त्यांच्यासाठीही स्वच्छतागृह नाही. स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांचीही कुचंबना होत आहे.
अक्षरश: मार्केट कमिटीच्या आवारात फेरफटका मारल्यास घाणिचे साम्राज्य दिसून येते आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली असून या भागातील व्यापारी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोट्यावधीची कमाई करणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समितीला एक चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह बांधून तेथे सफाई कर्मचारी ठेवणे सहज शक्य असतांना कृषि उत्पन्न बाजार समिती मात्र कोणतीच सुविधा देत नसल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
कृषि उत्पन्न बाजार समितीने मागील काळात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कमवलेले कोट्यावधी रूपयांचे झाले काय ? असा सवाल शेतकरी व व्यापारी बांधवांना पडला आहे. त्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संपूर्ण कारभाराची जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणीही कुंभार पिंपळगांवसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.