शेती विकून अख्खा गावांसाठी शौचालय बांधणारा अंबड तालुक्यातील ह्या गावातील अवलिया!
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
शासनाकडून कोट्यवधी निधी खर्चातून रोगराईला आळा घालण्यासाठी हागणदारीमुक्त गाव संकल्पना राबविली होती.मात्र,आजही गावे हागणदारीमुक्त झाली असे म्हणता येणार नाही.स्थानिक पातळीवर कागदोपत्री जरी हागणदारीमुक्त म्हणत असेल तरी गावांमध्ये बरेच नागरीक हातात टमरेल घेऊन जाताना दिसून येतात.
“आपल्याच घरातील नाही तर गावातील कोणत्याही घरातील महिला ही गावची इज्जत आहे ते इज्जत राखण्यासाठी ,शौचालया अभावी महिलांना सहन करावा लागणारा अपमान आणि त्यांची होणारी घुसमट सहन न झाल्याने एका ध्येयवेड्या ग्रामस्थाने स्वतःची दीड एकर शेती आणि बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकले ,आणि फक्त स्वतःच्याच घरी नव्हे तर पूर्ण गावातच शौचालय बांधून दिले. हे क्रांतिकारी कामअंबड तालुक्यातील डोमेगाव येथे ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचारी बाबासाहेब शेळके यांनी केले आहे.
“मात्र या ध्येयवेड्या ग्रामस्थाचं ना गावाला काही सोयरसुतक आहे ना प्रशासनाला !खरेतर लाखो रुपयांचे कागदपत्रावर घोडे नाचवणाऱ्या प्रशासनाने या कर्मचाऱ्याला एक पुष्पगुच्छ देऊनही सन्मानित केलं नाही, याहीपेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून ज्याच्यामुळे शौचालय मिळाले अशा या बाबासाहेब शेळके चा ग्रामस्थांनी अजूनही सत्कार केलेला नाही. मात्र या सत्काराची वाट न पाहता आजही बाबासाहेब शेळके जीवाच्या आकांताने गावासाठी झटत आहेत. शौचालयासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत या योजनांची वाट न पाहता बाबासाहेब शेळके यांनी आठ-दहा वर्षापूर्वी आपली दीड एकर शेती विकली आणि त्यामधून गावातील शौचालयाचे काम हाती घेतले. पैसा कमी पडला म्हणून त्यांनी बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र ही विकले आणि गावांमध्ये सुमारे दीडशे शौचालय बांधून दिली. आज सर्वच्या सर्व शौचालयांचा गावकरी वापर करीत आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात झाडे लावून त्यांनी एक नैसर्गिक वातावरणही निर्माण केले आहे.
“आशा या ध्येयवेड्या बाबासाहेब शेळके यांना त्यांच्या पत्नीने देखील तेवढीच साथ दिली आणि आपल्या गळ्यातील मंगळसूत्र नवऱ्याच्या हातात काढून दिले. या दोन्ही पती पत्नीचा त्याग वाखाणण्याजोगा आहे. मात्र त्यांच्या या त्यागाचं गावकऱ्यांना काहीच सोयरसुतक नाही, ज्या शेळके दाम्पत्यामुळे आपल्या घरातील महिलांची इज्जत झाकून राहिले आहे अशा कोणालाही या दाम्पत्याचा सत्कार करावासा वाटला नाही, ही एक खेदाची बाब आहे. प्रशासन तर कागदोपत्री घोडे नाचविण्यात पटाईत आहे , खरे तर शौचालय बांधून देण्याचे काम हे ग्रामपंचायत, विस्ताराधिकारी, गट विकास अधिकारी, या टीमचे आहे. मात्र या टीमची वाट न पाहता बाबासाहेब शेळके यांनी केलेलं हे धाडस वाखाणण्याजोगे आहे.