अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २ आरोपी अटक

न्यूज जालना | प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर साठा करून, त्यातील गॅस अवैधरित्या शहरातील खाजगी वाहनामध्ये भरणाऱ्या टोळीस सदरबाजार पोलीसांनी जेरबंद केले आहे़. त्यांच्या ताब्यातून सुमारे 2 लाख 24 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला अाहे़.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश रूपेकर व राजेंद्र वाघ यांना गोपनीय खबऱ्यामार्फत संभाजीनगर भागात गणेश कोल्हे याने त्याच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा साठा केला असून त्यातील गॅस अवैधरित्या खाजगी वाहनामध्ये भरून देत आहे, अशी माहिती मिळाली़.
त्यावरून सदरबाजार पोलीसांनी तात्काळ त्याठिकाणी छापा मारला असता त्यांना गणेश कोल्हे याच्या घरासमोर एका रिक्षामध्ये काही गॅस सिलेंडर आढळुन आले़.यावेळी पोलीसांनी त्यांच्या ताब्यातुन 2 लाख 24 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ तर आरोपी गणेश कोल्हे व त्याचा साथीदार नंदकिशोर वैष्णव यास ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगीरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार राजेद्र वाघमारे, समाधान तेलंग्रे, कैलास खार्डे, अमोल हिवाळे, यांनी पार पाडली़.