जुन्या वादातून गोळीबर, एकजण जखमी शिंदेवडगाव येथील घटना : आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जालना : जुन्या वादातून एका व्यक्तीवर गोळीबार करणाऱ्यास घनसावंगी पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास शिंदेवडगाव (ता.घनसावंगी) शिवारात घडली.
या प्रकरणात ऋषीकेश दत्तात्रय दाते (वय १९ रा.शिंदेवडगाव) याने फिर्याद दिली आहे. २५ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शिंदेवडगाव शिवारात विकास जंडे यांच्या शेतातील आखाड्यावर ऋषीकेश दाते उपस्थित होता. यावेळी संशयित आरोपी महेश येवले याने जुन्या भांडणाच्या कारणावरून ऋषीकेशवर गावठी कट्ट्याने गोळी झाडली. ऋषीकेशच्या तोंडावर व नाकावर गोळी लागल्याने तो जखमी झाला.
सदर घटनेबाबत गुरूवारी रात्री घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक केतन राठोड, आणि पोउपनि पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.