कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना शासन देणार ही मदत :आरोग्यमंत्री
अनाथ बालकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे
जालना दि.10- कोविड19 या महामारीमध्ये एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. पालक गमावल्यामुळे बालकांची मानसिक व वैयक्तिक हानी भरून निघणे शक्य नसले तरी या बालकांचे संगोपन होऊन त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी शासन या बालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जालना जिल्ह्यात कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने 10 अनाथ झालेल्या बालकांना प्रत्येकी 5 लक्ष याप्रमाणे 50 लक्ष रुपयांच्या मदतीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव पारवेकर, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी आर. एन. चिमन्द्रे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोहर बन्सलवार,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, बालगृह अधीक्षक अमोल राठोड, करंजे, आर.एस. सूर्यवंशी, सचिन चव्हाण, विनोद दाभाडे, सुरेखा सातपुते, रेणुका चव्हाण आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने या बालकांच्या डोक्यावरील मायेचा हात कायमचा गमावला आहे. या बालकांची मानसिक व वैयक्तिक हानी भरून निघणे शक्य नाही. शासन या बालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या बालकांच्या संगोपनात कुठलीही अडचण न येता बालकांच्या असलेल्या समस्या शासन व प्रशासनामार्फत सोडविण्यात येतील अशी ग्वाही देऊन बालकांनो खचून जाऊ नका, या अडचणीच्या काळात माझ्यासह प्रशासनातील प्रत्येक अधिकारी तुमच्यासोबत आहे. आजच्या युगात शिक्षणाशिवाय तरुणोपाय नसून प्रत्येक बालकांने चांगले शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहनही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केले.
कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनाथ झालेल्या बालकांची कौटुंबिक व आर्थिक हानी झाली आहे. अनाथ झालेल्या या बालकांचे भविष्य अंधकारमय न होता या बालकांना शिक्षण मिळून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने या बालकांना मदत करण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपये तर एक पालक गमावलेल्या बालकांना दरमहा 1 हजार 100 रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या 10 बालकांच्या नावे प्रत्येकी 5 लक्ष रुपयांचे मुदतठेव बँकांमध्ये ठेवण्यात आली असून मुलाला त्याच्या वयाच्या 21 व्या वर्षी तर मुलीला तिच्या वयाच्या 18 व्या वर्षी ही रक्कम मिळणार आहे. तसेच एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 200 एवढी असून त्यांना दरमहा 1 हजार 100 रुपयांचा लाभ देण्यात येत असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.