संपूर्ण महाराष्ट्रातील वीजपुरवठा होऊ शकतो कधीही बंद?; कोळशाच्या तुटवड्यामुळे 13 युनिट बंद

मुंबई-
कोळशाच्या संकटामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणाला वीज पुरवठा करणारे वीज केंद्रांचे एकूण 13 युनिट रविवारी बंद झाले. यामुळे राज्यात 3330 मेगावॅट वीज पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे ग्राहकांना कमी वीज वापरण्याचे आवाहन केले जात आहे.MSEDCL नं ग्राहकांना मागणी आणि पुरवठा यांचं संतुलन राखण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत वीजेचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला आहे. चंद्रपूर, भुसावळ आणि नाशिकचे 210-210 मेगावॅट, पारस -250 मेगावॅट आणि भुसावळ आणि चंद्रपूरचे 210-210 मेगावॅट युनिट बंद करण्यात आले आहेत. याशिवाय कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे 640 मेगावॅटचे 4 संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे 810 मेगावॅटचे 3 संच बंद आहेत. सध्या, विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यातील 3330 मेगावॅटचे अंतर भरण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी केली जात आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे विजेची खरेदी किंमतही महाग होत आहे.
खुल्या बाजारातून 13.60 रुपये प्रति युनिट दराने 700 मेगावॅट वीज खरेदी केली जात आहे. रविवारी सकाळी 900 मेगावॅट वीज रिअल टाईम व्यवहारांद्वारे 6.23 रुपये प्रति युनिट दराने खरेदी केली गेली. याव्यतिरिक्त, कोयना धरणाद्वारे तसेच इतर लहान जलविद्युत प्रकल्प आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज पुरवली जात आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या तापमानामुळे विजेची मागणीही वाढली आहे, तर कोळशाचा तुटवडा तीव्र होत आहे. त्यामुळे विजेविना महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.