वृक्षतोड करणाऱ्यांना अभय कोणाचे ?अवैध वृक्षतोड जोमात : प्रशासन कोमात
कुंभार पिंपळगाव:परीसरात अशाप्रकारे विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरद्वारे खुलेआम वाहतुक सुरू आहे.
कुंभारपिंपळगाव : कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात सध्या बाभूळ,आंबा,निंब,शेवरीच्या झाडांच्या वृक्षांची अवैध तोड करून खुलेआम ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केल्या जाते.
तसेच वनविभाग याकडे डोळेझाक करीत असल्याने सध्या रस्त्याच्या बाजूला व खासगी क्षेत्रातून बाभळी व इतर झाडांची कत्तल केली जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्ष तोडणार्यांनाही अभय निर्माण झाले आहे. गोदाकाठच्या भागात नदिपलीकडे जाणाऱ्या मार्गाने अवैध वृक्षतोडीची वाहतूक रात्री,अपरात्री जोमात सुरू आहे.तरी याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यावरण संतुलनासाठी अवैध वृक्षतोड थांबवावी,तसेच अवैध वृक्षतोडी जबाबदार कर्मचार्यांवर कार्यवाही करावी,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कुंभार पिंपळगाव परिसरातील गुंज,पिंपरखेड, अंतरवली टेभी, घोण्शी ,जांब समर्थ,धामणगाव सह अरगडे गव्हाण, खडका,राजा टाकळी,शिवणगाव, भांदली,लिंबी,मूर्ती,सिरसवाडी,देवी देहेगाव, मासेगाव,सिंदखेड,पाडुळी,कोठाळा,अंतरवाली टेभी,विरेगव्हान,जांब तांडा, सह अनेक गावांत इलेक्ट्रॉनिक मशीन ने झाडे तोडून औरंगाबाद, परभणी, बीड ह्या जिह्यात वाहतूक केली जाते वृक्षतोडीमुळे कुंभार पिंपळगाव परिसर उजाड झाला आहे.
काही दिवसांपूर्वी कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी मुख्य रस्त्यावर अज्ञात व्यापाऱ्यांनी झाडे तोडून घेऊन गेल्याची नुकतीच घटना घडली आहे. ह्याकडे वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. तर वन विभागाने मागील अनेक वर्षांपासून ह्या भागात एकही कारवाई केलेली नसल्याने वृक्षतोड बेसुमार मार्गाने चालू आहे. तर अवैध वाहतूक ही पोलासांच्या आशीर्वादाने चालू असल्याचे ग्रामस्थांतुन बोलले जात आहे.
आरामशीनचा वापर-लाकडे तोडून आरा मशिन च्या सहाय्याने विविध प्रकारचे लाकडांची तस्करी केली जाते.काही आरा मशिनही बेकायदेशीर असून याकडे संदर्भीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
३० प्रकारची कागदपत्रे आवश्यक :
शासनाने १३ कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली असली, तरीही परीसरात अवैध वृक्षतोड कायम आहे. मात्र, आता शासनाने मालकी प्रकरणाच्या वृक्षतोडीसाठी ३० प्रकारची कागदपत्रे आवश्यक केली आहेत. या परवानगीविना वृक्षतोड करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील, असे आदेश शासनाने काढले आहेत.वनविभागाचे प्रधान सचिव यांच्या स्वाक्षरीने याबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. अवैध वृक्षतोडीचे प्रकरण निदर्शनास आल्यास त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.मालकी जागेवरील वृक्षतोड परवानगीबाबत अर्ज आल्यास वनपाल, वनक्षेत्रपालांना घटनास्थळी जाऊन वृक्षाचे मूल्यांकन करावे लागणार आहे.