मराठावाडा

लोकशाहीत प्रसारमाध्यमेच सर्वाधिक प्रभावी-अशोक वानखेडे

images (60)
images (60)

लातूर:येथे आयोजित मराठवाडा स्तरीय विभागीय पहिल्या अधिवेशनात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे व समोर उपस्थित जनसमुदाय

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन संपन्न

कुलदीप पवार(प्रतिनिधी)

काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडावी लागली होती. त्यामुळे भारतीय लोकशाहीत राजकर्ते, प्रशासन, न्याय आणि प्रसारमाध्यमे या चार व्यवस्था प्रमुख असल्या तरी सर्वाधिक प्रभाव पत्रकारांचा आहे. प्रश्‍न सत्ताधार्‍यांनाच विचारले जातात याचे भान बहुमताने सत्तेवर असलेल्यांनाही असले पाहिजे. असे सांगत प्रामाणिकपणे पत्रकारीता करणार्‍यांची सत्ताधार्‍यांनाही धास्ती असते असे मत ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे पहिले मराठवाडा विभागीय अधिवेशन रविवार दि. 28 नोव्हेंबर रोजी लातूर येथे दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी राष्ट्रसंत एकनाथ महाराज, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे, मार्गदर्शक संतोष मानूरकर, संजय जेवरीकर, माहिती व जनसंपर्क लातुर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, विभागीय सचिव दिपरत्न निलंगेकर, विभागीय उपाध्यक्ष दयानंद जडे, संयोजक लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना अशोक वानखेडे यांनी लोकशाही व्यवस्थेतील प्रसारमाध्यमांचे महत्व स्पष्ट करताना अनेक दाखले दिले. लोकशाही चार खांबावर उभी आहे असे आपण मानतो. मात्र यात सर्वाधिक प्रभाव माध्यमांचा आहे. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनाही आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकारांसमोर येऊन व्यक्त व्हावे लागले. तर सरकारमधील सत्ताधार्‍यांना अनेकदा माध्यमांचाच आधार घ्यावा लागतो. हे लक्षात घेऊन पत्रकारांनीही प्रामाणिकपणे काम करत आपला दरारा निर्माण केला पाहिजे. राजकीय नेत्यांना पत्रकारच बातम्यांमधून घडवत असतो. त्यांना जर पत्रकारांची किंमत वाटत नसेल तर आपण पत्रकारांनीही त्यांना त्यांची जागा दाखवण्याची क्षमता ठेवली पाहिजे. लातुरचे दिवंगत विलासराव देशमुख, बीडचे गोपीनाथ मुंडे, नांदेडचे शंकरराव चव्हाण या नेत्यांनी देशात नेतृत्व केले. त्यांची सर्वसामान्य माणसाशी आणि पत्रकारांशी नाळ जोडलेली होती. पत्रकारांची शक्ती त्यांना माहित होती. त्यामुळे वर्तमान परिस्थितीमध्ये प्रत्येक देशमुख, विलासराव आणि प्रत्येक मुंडे, गोपीनाथराव तर प्रत्येक चव्हाण, शंकरराव होत नसतात असा टोलाही त्यांनी लगावला. तर दिल्ली, मुंबई या शहरातून होणारी पत्रकारीता आणि ग्रामीण भागातील पत्रकारीता यात खूप मोठा फरक आहे असे सांगत त्यांनी अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
तर प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार सातत्याने सरकारकडे मागण्या करत आहेत. मात्र सरकार फारसे गांभीर्याने घेत नसल्याने पत्रकारांचे प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. कोरोना काळात सरकारने आरोग्य आणि पोलिस कर्मचार्‍यांप्रमाणे पत्रकारांनाही विमा संरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र अंमलबजावणी केली नाही ही सार्वजनिक फसवणूक आहे. त्यामुळे सरकारकडे मागण्या करण्यापेक्षा बदललेल्या परिस्थितीत स्थानिक पातळीवरील वृत्तपत्र व पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पारंपारीक धोरण बदलावे लागेल. स्वस्तात वृत्तपत्र देऊन तोटा भरुन काढण्यासाठी जाहिरातीवर अवलंबून राहण्याचे दिवस आता संपले आहेत. दहा वर्षात सर्वच वस्तुंचे भाव वाढले आहेत. सरकारने विविध कर लावले आहेत. अशा परिस्थितीत वृत्तपत्रांना विक्री किंमत वाढवूनच सक्षम व्हावे लागेल. संपादकांच्या गोलमेज परिषदेनंतर महाराष्ट्रातील दोनशे दैनिकांनी अंकाची किंमत वाढवली. इतरांनीही आता पुढाकार घेतला पाहिजे. इतर व्यवस्थापनाप्रमाणे वृत्तपत्रांनीही आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेऊन आपल्या खर्चात बचत करुन कर्मचार्‍यांनाही उसंत द्यावी असे आवाहन केले. तर राज्य संघटक संजय भोकरे यांनी पत्रकारांनी काम करत असताना आरोग्याकडेही लक्ष द्यावे. आरोग्य चांगले असेल तरच चांगले काम होऊ शकते असे स्पष्ट केले. प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांनी पत्रकार संघाची भूमिका यावर विस्तृत मार्गदर्शन करुन पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन 18 डिसेंबर 2021 रोजी ठाणे येथे होणार असल्याचे जाहीर केले. तर विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी पत्रकारांमधून विधीमंडळात एक आमदार असावा ही मागणी करुन ठराव घेतला. प्रास्तविक जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी केले. विभागीय अधिवेशनाला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यासह राज्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पहिल्या विभागीय मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे, ग्रामीणचे अध्यक्ष शांताराम मगर, जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, परभणी जिल्हाध्यक्ष विलास चव्हाण, हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.भास्कर भोसले, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, बीडचे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव यांनी केलेल्या परिश्रमामुळे मराठवाड्यातील प्रत्येक तालुका आणि ग्रामीण भागातील पत्रकार अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने विभागस्तरावरील पहिले अधिवेशन ऐतिहासिक ठरले. शुभम धुत, गौतम खटोड, शेख अल्ताफ समाजभुषण पुरस्काराने सन्मानित पत्रकार संघाच्या वतीने समाजसेवेमध्ये निस्वार्थ भावनेने काम करणार्‍यांपैकी प्रातनिधीत स्वरुपामध्ये दिलीप धुत परिवारातून त्यांचे चिरंजीव नगरसेवक तथा राजयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष शुभम धुत यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कीर्तनाच्या माध्यमातून भावी पिढीला सुसंस्कारीत करण्याचे कार्य मागील अकरा वर्षांपासून अविरत केल्याबद्दल स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठाणचे संस्थापक गौतम खटोड यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात गरजवंतांना दोनवेळचे जेवण तयार करुन निस्वार्थ भावनेने देणारे शेख अल्ताफ यांना देखील पत्रकार संघाच्या वतीने समाजभूषण 2021 पुरस्कार हा ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत एकनाथ महाराज, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या आठी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांना स्मृतीचिन्ह, शाल, डायरी भेट देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!