राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये
जिल्ह्यात 298 प्रकरणे निकाली
न्यूज जालना
महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई व राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या निर्देशानुसार आज राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा न्यायालय, जालना येथे व जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात एकाच वेळेत संपन्न झाली.
जिल्ह्यात या लोकअदालतीमध्ये एकुण 298 प्रकरणे आपसी सामंजस्याने निकाली काढण्यात आली राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा न्यायालयात अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाले. यावेळी “एक मुठ्ठी आसमान” या गीताची चित्रफीत पक्षकार बंधुना दाखवून राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये समोपचाराने वाद मिटविण्याबाबत आवाहन करण्यात
आले.
लोकन्यायालयात वैवाहिक वाद, मोटार वाहन अपघात, दिवाणी व फौजदारी 138 एन. आय. ॲक्ट नुसार भुसंपादनाची प्रकरणे, कामगार संबंधिचे वादाचे प्रकरणे, विद्युत प्रकरणे, पाणी बिल ,महसुलची प्रकरणे व दावा दाखल पुर्व प्रकरणे या राष्ट्रीय अदालतीमध्ये आपसी सामंजस्याने तडजोड करण्यासाठी ठेवण्यात आले होते.
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुका विधीसेवा समिती करीता एका जिल्हा न्यायाधीशांची नेमणुक करुन वेळोवेळी आढावा घेण्यात आला. तसेच लोकन्यायालयाच्या दिवशी समोपचाराकरीता विशेष न्यायाधीशांची नेमणुक करुन पक्षकारांना लोकन्यायालयात खटला समोपचाराने मिटविण्याकरीता समुपदेशन करण्यात आले.
जिल्ह्यामधील कौटुंबिक, वैवाहिक छोट्या वादातुन 15 कुटुंबांचे प्रकरणे सामंजस्याने निकाली काढले. त्यातील एका प्रकरणात वरिष्ठ नागरिकाने गेल्या सात वर्षापासुन प्रलंबित असणारा कौटुंबिक वाद आपसी सामंजस्याने मिटवला.
जालना व परतुर तालुक्यात कलम 138 एन.आय. ॲक्ट नुसार असलेली पाच वर्ष जुनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली.
प्रलंबित 181 खटल्याच्या तडजोडीत एकुण रक्कम रुपये 1 कोटी 55 लाख 40 हजार 91 व दावा दाखल पुर्व 75 खटल्याच्या तडजोडीतुन एकुण रक्कम रुपये 1 कोटी 3 लाख 59 हजार 837 प्रमाणे तडजोड करण्यात आले.
या ऐतिहासिक उपक्रमास सर्व पक्षकार, विधीज्ञ, शासनाचे प्रतिनिधी, बँक पतसंस्थेचे प्रतिनिधी यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
लोकअदालत कोवीड प्रतिबंधक सर्व नियमावलीचे पालन करुन पार पाडण्यात आली, अशी माहिती सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.