जालना:महामंडळाकडुन कर्ज घेतलेल्या लाभार्भ्यांना थकीत व्याज रक्कमेवर 2 टक्के सवलत
जालना दि. 18 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित , मुंबई यांचे जिल्हा कार्यालय, जालना यांचे मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.
जालना जिल्ह्यातील थकीत वसुलीबाबतच्या आढावानुसार दि. 31 मार्च 2021 रोजीची रक्कम रु. 462.39 लक्ष इतकी असल्याने थकीत लाभार्थी, त्यांचे जामीनदार हमीपत्र,पगारपत्र धारकाचे वेतनातुन कपात ,गहाणखत (कर्ज बोजा नोंद उतारे) इत्यादीच्या आधारे दिवाणी दावे , महाराष्ट्र जमीन महसुल कायदा 1966 मधील तरतुदीनुसार आर.आर.सी. इत्यादी अंतर्गत कार्यवाही करुन वसुली करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
त्यानुसार महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडुन कायदेशिर कार्यवाही करण्याचे कामकाज चालु झालेले आहे. या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील थकीत लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, महामंडळाकडुन दि. 31 मार्च 2022 पर्यंत थकीत व्याज रकमेवर लाभार्थीना 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यांचा लाभ घेऊन सर्व संबधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी भरणा करुन कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे व कायदेशिर कार्यवाही टाळावी असे निर्देश जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी सांगितले आहे.