पिण्याच्या पाण्याशिवाय पाणी उपसा करण्यास सक्त मनाई- जिल्हाधिकारी
जालना जिल्ह्यातील 30 गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अंतिम :
जालना दि. 18 :- जालना जिल्ह्यातील 30 गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अंतिमत: जाहीर करुन पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित होण्याच्यादृष्टीने स्त्रोतापासुन 500 मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाशिवाय अन्य कारणासाठी स्त्रोत निर्माण करण्यास अथवा या सार्वजनिक स्त्रोतामधुन पिण्याच्या पाण्याशिवाय पाणीउपसा करण्यास महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 मधील कलम 20 नुसार प्राप्त अधिकारान्वये प्रतिबंध करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी निर्गमित केले आहेत.
पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्यात आलेल्या 30 गावांपैकी अंबड तालुक्यातील आलमगाव, आपेगाव, भालेगाव,चांभारवाडी, चंदनापुरी खु. चिंचखेड, चुरमापुरी, धनगर पिंपळगाव, कर्जत, लोणार भायगाव व रामनगर अशी एकुण 11 गावे, भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा, गोद्री, हसनाबाद, नळणी खु. नांजा व वाडी, बरंजळा साबळे, श्रीकृष्ण नगर, वडशेद अशी एकुण 8 गावे, जालना तालुक्यातील धारकल्याण, हिवरा रोषणगाव, कार्ला, सिंधी काळेगाव, वाघ्रुळ जहांगिर, सोमनाथ, हातवन, आंतरावाला (जालना), दरेगाव (जालना) अशी 9 गावे तर जाफ्राबाद तालुक्यातील चिंचखेडा व सातेफळ या गावांचा समावेश आहेत. यापूर्वी देण्यात आलेल्या जाहिर प्रगटनाचा कालावधी संपुष्टात येऊन एकही लेखी, स्वरुपात मागण्या, सुचना अथवा हरकती प्राप्त झाल्या नसल्याने ही स्त्रोत अंतिम करण्यात आले आहेत.
या आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, 2009 अन्वये जालना जिल्ह्यातील संबंधित उपविभागीय अधिकरी व तहसिलदार यांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच या बाबी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद जालना तसेच संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांनी वेळोवेळी होणा-या बैठकीमध्ये आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रकरण सक्षम अधिका-याकडे पाठवावित, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.