जालना कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 6 कैद्यांना कोरोनाची लागण
जालना / प्रतिनिधी
जालन्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज 200 पेक्षा अधिक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. आता कारागृहात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कारागृहातील 6 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये पाच पुरुष तर एका महिला कैदीचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाच्या मागील दोन्ही लाटेमध्ये सुरक्षित असलेल्या जालन्याच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना आता कोरोनाची लागण झाली असल्याने कारागृह प्रशासना समोर चिंतेचे वातावरण पसरले आहे.आरोपीला पकडल्यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली जाते आणि त्यानंतर न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहात पाठविले जाते.
दरम्यानच्या काळात आरोपीची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर याचा निकाल येण्यासाठी एक ते दोन दिवसाचा वेळ जात आहे. त्यामुळे नवीन आलेला कैदी जुन्या कैद्यांच्या संपर्कात येऊन कोरोनाची लागण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.