जालना पोलीस: वर्षभरात २६ मिसींग व्यक्तीना शोधण्यास यश
जालना | प्रतिनिधी
गेल्या वर्षभरात जिल्हाभरातुन तब्बल 26 मिसिंग झालेल्या व्यक्तींना वेगवेगळ्या जिल्ह्यातुन किंवा राज्यातुन शोधून काढण्यात सदरबाजार पोलीसांना यश आले आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम पवार यांच्या पथकाने ही विशेष कामगिरी केली आहे़
काही दिवसांपूर्वीच शहरातील साईनगर भागातील संगीता लालझरे यांनी त्यांचे पती सुनील लालझरे हे घरात कुणालाही काहीएक न सांगता कोठेतरी निघून गेले असल्याचे पोलीसांना कळवले होते. याबाबत पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. सपोनि पवार यांनी नातेवाईकांना विश्वासात घेऊन मित्रमंडळीच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, सुनिल लालझरे हे कल्याण रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यावरून पोलीसांनी त्यांना कल्याण येथून ताब्यात घेऊन त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे़
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार, पोलीस नाईक सक्रूदिन तडवी यांनी केली आहे.