संपादकीय

प्रेम करावं…..

प्रेम करावं…
काळ्या भुईवर…जन्मदात्या आईवर
इतिहासाच्या पानावर,भुगोलाच्या नकाशावर
हिरव्या निसर्गावर,ऊंच डोंगररांगावर
गाईच्या वासरावर,हसऱ्या बाळावर
निळ्या आकाशावर,पक्ष्यांच्या थव्यावर….

images (60)
images (60)

प्रेम करावं….
कौशल्येच्या रामावर,राधेच्या कान्हावर
बुध्दाच्या चेहऱ्यावर, महावीराच्या वाणीवर
तुकोबांच्या अभंगावर,माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर
नामदेवांच्या गवळणीवर,नाथांच्या भारूडावर
कबीराच्या दोह्यावर,शाहीरांच्या पोवाड्यावर…

प्रेम करावं…
कृष्णाच्या बासरीवर,मीरेच्या घुंगरावर
शिवबांच्या गड किल्ल्यावर
मावळ्यांच्या पराक्रमावर
चंद्रभागेच्या वाळवंटावर,कोकिळ कंठावर
जनाईच्या ओव्यांवर,मंदिराच्या घंटेवर….

प्रेम करावं…
वाहत्या धारेवर,गवताच्या पात्यावर
खडकाळ रानावर,श्रावणसरीवर
नदीच्या तीरावर, समईतील वातीवर
पौर्णिमेच्या चांदण्यावर,मैत्रीच्या नात्यावर
ईंद्रधनुच्या रंगावर,सागराच्या लाटेवर…

प्रेम करावं…
सुंदर पुस्तकांवर,मायमराठी भाषेवर
चुलीवरील भाकरीवर,सुगंधी फुलांवर
मराठी नाटकांवर,तमाशाच्या लावणीवर
सुगरणीच्या खोप्यावर, मयुराच्या पंखावर
सुंदर वेलीवर, रंगीत फुलपाखरांवर…

प्रेम करावं…
दारातल्या रांगोळीवर,गप्पांच्या मैफलीवर
गंधीत अत्तरावर,आजीच्या स्पर्शावर
राबणाऱ्या हातांवर,पत्नीच्या समर्पणावर
गोड रसाळ आंब्यावर,गुलाबी थंडीवर
मराठी कादंबरीवर,निसर्ग कवितेवर…

शेवटी प्रेम कुणी कुणावर करावं
हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे…
प्रेम करण्यास एक दिवस नको
संपूर्ण आयुष्याची ती देणं आहे….

लेखक
🌷सारंग काळे🌷

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!