गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी
श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा “शिवा” असेही म्हणले जात या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते.गणेशाला मोदक खूप आवडतात. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो, त्याचप्रमाणे जास्वंदीचे फुल,शमी पत्री आणि दुर्वा या ही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे.स्त्रीमनाचे लोकदैवत असे ही श्री गणेशाला मानतात.श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रमुख्याने माती पासूनच बनवलेल्या गणेश मूर्तिचे पूजन केले जाते.गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या
प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यतः उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते.काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते. या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथाचे वाचनही केले जाते.भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.
मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.
लेखक :- ॲड रविंद्र लक्ष्मण काटकर
( जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
संपर्क :- 8308152705 )