वाळूमाफियांसोबत झटापट;पोलिसांचा हवेत गोळीबार
जालना- वाळूतस्करीसंदर्भातील गुन्ह्यात फरार असलेल्या वाळूमाफियाला अटक करण्यासाठी गेलेल्या बदनापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड आणि पोलीस पथकावर सराईत वाळूमाफिया यांच्यासह गुंडांनी हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी बदनापूर तालुक्यातील दाभाडी- चिखली रोडवर घडली आहे. यावेळी सपोनि. रामोड यांच्यावर भ्याड हल्ला करून, त्यांच्याजवळील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावण्याच्या प्रयत्नात खटका दाबल्या गेल्याने अचानक गोळी सुटली, ही गोळी जमिनीच्या दिशेने सुटल्याने अनर्थ टळला.
तब्बल दोन तास सुरु असलेल्या वाळूमाफियांच्या या राड्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणात ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. याप्रकरणात पाच जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.
वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल खात्याने मागील जानेवारी २०२२ महिन्यात आरोपी याच्या हायवासह काही वाहने पकडली होती. ही वाहने नंतर पळवून नेण्यात आल्यामुळे तलाठ्याच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस १८ जानेवारी आरोपी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेंव्हापासून आरोपी फरार होता.
काल दुपारी (२१ मार्च)चिखली गावाकडून आरोपी यांचा मुलगा वाळूचा हायवे घेऊन दाभाडीकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि. रामोड पोलीस पथकासह पाठलाग करण्यासाठी गेले होते. तेथे दानवे आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. ही माहिती कळताच एका वाहनातून आरोपी हा दोन महिलांना सोबत घेऊन घटनास्थळी आला. तेथे महिलांनी आणि सोबतच्या लोकांनी रामोड यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या अंगावर बसून हल्लेखोरांनी बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी बंदुकीचा ट्रिगल दबल्या गेल्याने अचानक गोळी सुटली आणि आरोपी समर्थक पळत सुटले.
दरम्यान, पोलिसांनी वाळूमाफियांच्या गुंडांचा पाठलाग करून ९ पैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांनी दिली आहे.