भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने रेल्वे दिवसानिमित्त रेल्वेमंत्री दानवे यांचा सत्कार
जालना, प्रतिनिधीः भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने जालना रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वे दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रेल्वेस्थानकावर उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सत्कारही सेलच्या वतीने करण्यात आला.
भारतीय रेल्वे दिवसाबाबत माहिती देताना जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे म्हणाल्या की, भारतात पहिली रेल्वे गाडी धावण्याच्या घटनेला आज 168 वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशांनी बोरीबंदर ते ठाणे ह्या मार्गावर 16 एप्रिल 1853 साली पहिली गाडी चालवली. त्यांनी त्यांचा व्यापार पसरवण्यासाठी ती चालवली असली तरी त्या चाका बरोबर भारताच्या प्रगतीची घोडदौड सुरू झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार असलेले रावसाहेब दानवे ह्यांनी हा पदभार स्वीकारला आणि आमच्या मराठवाड्याची पण रेल्वे रुळावर आणून विकासाची चाके फिरू लागली. जालना- पुणे एक्सप्रेस रेल्वे, किसान रेल ही आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा माल वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचविण्याचे काम करायला लागल्याचे सांगून आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे नमूद केले. याप्रसंगी जनशताब्दी चालक तसेच स्टेशनमास्तर अशोक तापसे, अमित किरण सिंग, मृत्यूंजय, विलास आव्हाड यांचाही सत्कारही सेलच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष शुभांगी देशपांडे, दीपा बिन्नीवाले, जान्हवी वैद्य, अमृता पाटील, सचिन पाटील, नीलावती धावणे, रोहिणी टाकळकर, धनश्री सबनीस आदींची उपस्थिती होती.