जालन्याचा पोलीस अधीक्षकपदाचा हर्ष पोद्दार यांच्याकडे अतिरिक्त पदभार
जालना- आगामी रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जालना येथील जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 चे समादेशक हर्ष पोद्दार यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. हा कार्यभार केवळ आठ दिवसासाठी म्हणजे दि. 1 मे 2022 ते 8 मे 2022 या कालावधीसाठीच राहणार आहे.
चंद्रपूर येथून नव्याने बदलून येत असलेले पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे राजकीय आडकाठीमुळे अद्याप रुजू झालेले नाहीत. त्यामुळे येथील पोलीस अधीक्षक पद रिक्त आहे. सध्या रमजान ईद हा सण असल्यामुळे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांनी एका आदेशानुसार प्रारंभी जालना येथील पोलीस अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार मुंबई येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ चे समादेशक शशी मीना यांच्याकडे देण्याचा आदेश काढला होता.
त्यानंतर पुन्हा एक आदेश काढून त्यामध्ये दुरुस्ती करून शशी मीना यांच्याऐवजी अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 चे समादेशक हर्ष पोद्दार यांच्याकडे पदभार सोपविण्याचे आदेश काढले आहेत.
राजकीय साठमारीत पोलीस अधीक्षक यांचे पद अडकलेले असतानाच तात्पुरते का होईना आठ दिवसासाठी जिल्ह्याला अतिरीक्त पोलीस अधीक्षक मिळणार असल्याने सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार आहे.