जालना जिल्हा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची होत आहे आर्थिक उन्नती – पालकमंत्री टोपे

शेतकरी गट व कंपनी यांना फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न

images (60)
images (60)

जालना, दि. 29 — नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत जालना जिल्ह्यात उत्कृष्टपणे कामे सुरू आहेत. याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे लाभ होताना दिसत असून त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार मिळत आहे. त्यामुळे या योजनेला अधिक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकरी गट व कंपनी यांना फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी चार वाहनांचा लोकार्पण सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी
समर्थ सहकारी बँकेचे मुख्य व्यवस्थापक विजय कानुजे, माजी सभापती भागवत रक्ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भिमराव रणदिवे, आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, पोकराचे आप्पासाहेब शेडगे, विशाल डेंगळे आणि शेतकरी उपस्थित होते


पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, पोकरा या योजनेच्या माध्यमातून शेतमाल वाहतुकीसाठी वाहन भाड्याने देणे या कृषी व्यवसाय घटकातून आज चार वाहने चार शेतकरी गटांना वाटप करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना वर आणणे व त्यांच्या भागात शेतीला पूरक जोड धंदा देणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवून पोकरा अंतर्गत काम करण्यात येत आहे आणि ते उद्दिष्ट सार्थकी झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. या योजनेमुळे शेतकरी अधिक उद्योगी होत आहेत. कामामध्ये व्यस्त राहत आहेत. यातून त्यांच्या भागाची प्रगतीही होत आहे. त्यामुळे पोकरासारख्या योजनेला अधिक प्रोत्साहन देण्याचे गरजेचे आहे.


पोकरा अंतर्गत शेतमाल वाहतुकीसाठी वाहन भाड्याने देणे या कृषी व्यवसाय घटकातून जालना जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी यांना दहा टन क्षमतेच्या वाहनांचे आज लोकार्पण संपन्न झाले. शेतीमध्ये उत्पादित होणारा शेतमाल हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने तो तात्काळ बाजारपेठेशी जोडला जाणे गरजेचे असते. अशा मालाला तात्काळ बाजारभाव मिळावा ही शेतमाल विक्रीतील महत्त्वाची साखळी लक्षात घेऊन ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने संजीवनी सदर वाहनांच्या माध्यमातून मिळणार आहे. या वाहनातून फळे व भाजीपाल्याची विक्री हैद्राबाद, बंगलोर, मुंबई या ठिकाणी करता येणार आहे.


Related Articles

Back to top button
error: Content is protected !!