मागील दोन महिन्यापासून पोलीस अधीक्षक पद रिक्त असल्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली

मागील दोन महिन्यापासून पोलीस अधीक्षक पद रिक्त असल्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली, तातडीने पोलीस अधीक्षक नियुक्त करण्याची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.भास्करराव अंबेकर यांची मागणी
जालना /प्रतिनिधी, दि.01.06.2022
जालना (दि.01) जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पद मागील दोन महिन्यांपासून रिक्त असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला तात्काळ पोलीस अधीक्षक नियुक्त करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री भास्करराव अंबेकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. राजेशजी टोपे यांच्याकडे केली आहे.
पालकमंत्री श्री राजेशजी टोपे यांना दिलेल्या निवेदनात जिल्हाप्रमुख श्री. भास्करराव अंबेकर यांनी म्हटले आहे की, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री.विनायक देशमुख यांची बदली होऊन दोन महिने होत आहेत. परंतु जालना जिल्ह्यात बदली झालेले पोलिस अधीक्षक माननीय श्री.अतुल कुलकर्णी हे रुजू न झाल्याने पोलीस अधीकक्षकांविना कारभार सुरू आहे. दरम्यानच्या काळात मनसेचे भोंगा काढण्याचे आंदोलन काही राजकीय पक्षांचे हनुमान चालीसा पठण यामुळे कायदा-सुव्यवस्थेचे निर्माण होऊ शकणारे प्रश्न अशा परिस्थितीत पोलीस अधीक्षक असणे अत्यंत महत्त्वाचे होते. पोलीस अधीक्षक नसल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून या कालावधीत मोठ्या प्रमाणावर खून, 307, 302 असे गुन्हे, व्यापाऱ्यांना लुटणे व चोऱ्या यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. या सर्व घटनांमुळे सामान्य माणसांमध्ये भीती व दहशत निर्माण झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून सामान्य माणसाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी पोलीस अधीक्षक असणे गरजेचे आहे.
पालकमंत्री हे जिल्हा व सरकारमधील दुवा असतात जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. कोरोना काळातील आपल्या कार्याचे संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केले आहे. असे असताना अत्यंत महत्त्वाच्या कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या व गुन्हेगारांवर जरब बसवून सामान्य माणसाच्या मनातील भीती घालवीणारी खुर्ची मागील दोन महिन्यापासून रिक्त असणे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे.
येणारा काळ पावसाळ्याचा असून मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. संभाव्य आपत्ती लक्षात घेता अशावेळी जबाबदार व्यक्ती पदावर असते आवश्यक आहे. पोलीस अधीक्षकांची खुर्ची रिक्त असल्याने जिल्ह्यातही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असल्याचे नमूद करून तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्याची विनंती शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. भास्करराव अंबेकर यांनी केली आहे.